गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची जिल्हा परिषद सीईओंसोबत चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी डॉ. मिलींद नरोटे यांनी आज जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील नागरिकांच्या विविध वैयक्तिक तसेच सार्वजनिक तक्रारींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मतदारसंघातील अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन उपस्थित होते. त्यांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडत त्या तातडीने निकाली काढाव्यात, अशी आग्रही भूमिका आमदार डॉ. नरोटे यांनी घेतली. विशेषतः ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, मूलभूत सेवा आणि जनसामान्यांच्या दैनंदिन प्रश्नांवर यावेळी सखोल चर्चा झाली.
बैठकीत शैक्षणिक विषयांनाही विशेष महत्त्व देण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ‘क्लस्टर शाळा’ पद्धतीची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत होणारी वाढ यावर सविस्तर संवाद साधण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, शाळांचा दर्जा उंचावणे आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
मतदारसंघातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा तसेच शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला गती मिळावी, यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, अशी अपेक्षा यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केली.
News - Gadchiroli




Petrol Price




