महत्वाच्या बातम्या

 वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचा फटका गर्भवती महिलेला : कारगील चौकातील घटनेने शहर हादरले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या बेफिकीर वाहनचालकामुळे गंभीर परिणाम कसे होऊ शकतात, याचे धक्कादायक उदाहरण गडचिरोली शहरातील कारगील चौकात समोर आले. वाहतूक पोलिसांना पाहून एका अल्पवयीन दुचाकीस्वाराने अचानक यू-टर्न घेतल्याने झालेल्या अपघातात गर्भवती महिला आणि तिच्यासोबत असलेले तीन वर्षीय बालक रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. या प्रकारामुळे उपस्थित नागरिकांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारगील चौकात वाहतूक पोलिसांचे नियमित तपासणी अभियान सुरू असताना चंद्रपूर मार्गाकडून येणारा एक अल्पवयीन दुचाकीस्वार पोलिसांच्या नजरेस पडला. कारवाई होण्याच्या भीतीने त्याने चौकात अचानक वाहन थांबवून यू-टर्न घेतल्याचे सांगितले जाते. याच वेळी मागून येणाऱ्या दुचाकीवरील पती-पत्नींच्या वाहनाची त्याच्याशी धडक झाली.

या अपघातात गर्भवती महिला आणि तिच्यासोबत असलेले तीन वर्षीय बालक रस्त्यावर पडले. महिलेच्या हातापायांना दुखापत झाली. अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मात्र, अपघातास कारणीभूत ठरलेला अल्पवयीन दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिसांसह समाजसेवक उदय धकाते, महेंद्र वाघमारे, बादल आडेकर आणि अन्य नागरिकांनी मदतकार्य केले.

या घटनेनंतर शहरात अल्पवयीन मुलांकडे वाहनांची चावी कशी पोहोचते आणि पालक आपल्या जबाबदारीकडे कितपत गांभीर्याने पाहतात, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केवळ स्वतःच्या नव्हे तर इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण करू शकते, याची पुन्हा एकदा जाणीव या घटनेने करून दिली आहे.

कोट : उदय धकाते (समाजसेवक व जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत गडचिरोली) यांची प्रतिक्रिया -
कारगील चौकात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. अल्पवयीन मुलांकडून होणारे बेजबाबदार वाहनचालन केवळ कायद्याचे उल्लंघन नसून इतरांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण करणारे आहे. एका गर्भवती महिलेला आणि तिच्या लहान मुलाला याचा फटका बसणे ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना अल्पवयात वाहने देणे टाळावे, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक कठोर कारवाई करावी. वाहतूक नियमांचे पालन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

दरम्यान, या घटनेनंतर शहरात वाहतूक नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच अल्पवयीन वाहनचालकांविरोधात अधिक कठोर मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos