महत्वाच्या बातम्या

 र्गम भागातील वीजसमस्यांवर संसदेत मंथन : पुरवठा सुरळीत करण्याची मागणी


- खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत मांडले प्रश्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागांमधील वीजपुरवठ्याच्या समस्या प्राधान्याने सोडवून नागरिकांना नियमित व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली. नवी दिल्ली येथे ३० ऑक्टोबर रोजी आयोजित ऊर्जा विभागाच्या संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी मतदारसंघातील वीजसमस्यांकडे समितीचे लक्ष वेधले.

नवी दिल्ली येथील विस्तारित संसद भवनातील समिती कक्षात समितीचे अध्यक्ष श्रीरंग अप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. किरसान यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील दुर्गम भागांमधील वीजपुरवठ्याच्या अडचणी मांडल्या. या भागातील भौगोलिक परिस्थिती, विखुरलेल्या वसाहती आणि दुर्गम गावांचा विचार करता वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विशेष नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

दुर्गम भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वीज वितरण यंत्रणेचा विस्तार करणे, नवीन पायाभूत सुविधांची उभारणी करणे तसेच विद्यमान यंत्रणेची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. वीजपुरवठा हा केवळ मूलभूत सुविधेचा विषय नसून तो शेती, शिक्षण, लघुउद्योग आणि ग्रामीण जनजीवनाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण व आदिवासीबहुल भागांमधील वीजसमस्या गांभीर्याने घेऊन त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी बैठकीत मांडली.






  Print






Related Photos