चंद्रपुरात ८.६० कोटींच्या गुंतवणूक फसवणुक, १२ जणांवर गुन्हा : १,३३१ गुंतवणूकदारांची रक्कम अडकल्याचा दावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आकर्षक व्याजदर आणि चांगल्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारल्यानंतर मुदत संपूनही रक्कम परत न केल्याचा गंभीर प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे. युवोवा ध्येय अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसाय टीमध्ये तब्बल ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकी प्रकरणी रामनगर पोलिसांनी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक आणि संचालकांसह एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात १ हजार ३३१ गुंतवणूकदारांची रक्कम अडकल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार चंद्रकिशोर नामदेव मांडवकर यांच्या तक्रारीनुसार, संबंधित सोसायटीने बचत खाते, मुदत ठेव, दैनिक व मासिक ठेव यांसह विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांकडून गुंतवणुकीच्या स्वरूपात पैसे स्वीकारले. गुंतवणुकीवर आकर्षक व्याज आणि चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ठेवीदारांचा विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप आहे. मार्च २०२६ पासून अनेक गुंतवणूकदारांच्या ठेवींची मुदत पूर्ण होऊनही त्यांना पैसे परत मिळाले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांनी वारंवार पैशांची मागणी केली असता त्यांना टाळाटाळ करण्यात आली, तसेच नंतर रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या कष्टाच्या पैशांची गुंतवणूक केलेल्या अनेक ठेवीदारांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या स्वतःच्या ठेवी आणि कमिशनसह एकूण ८ लाख ८४ हजार १७४ रुपये थकीत आहेत. याशिवाय अन्य १ हजार ३३१ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५१ लाख ११ हजार ६६४ रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दोन्ही रकमा मिळून कथित फसवणुकीची एकूण रक्कम ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपये असल्याचे प्रथम माहिती अहवालात नमूद आहे.
या प्रकरणात सोसायटीचे सीईओ रमेश शामराव बोरकुटे, अध्यक्ष सचिन हरिदास पानघाटे, उपाध्यक्ष एलीजा रमेश बोरकुटे, व्यवस्थापक तथा संचालक अपेक्षा स्नेहदीप जोब आणि संचालक अतुल सोपन बनसोड, दुर्गा गौरंग मंडल, वैशाली मधुकर बुच्चे, पल्लवी ऋषी वासेकर, तेजस्विता अनित्य लोखंडे, प्रीती विनोद मिलकर, वैभव गुरुदेव चौधरी व विकास देवराव दुधबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रामनगर पोलिसांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमांतर्गत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत रमेश थिटे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. गुंतवणूकदारांची नेमकी किती रक्कम थकीत आहे आणि या प्रकरणात कोणाची काय भूमिका आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.




Petrol Price




