महत्वाच्या बातम्या

 कापूस वेचणी करताना वाघाचा अचानक हल्ला : शेतकरी गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतात कापूस वेचणीचे काम सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याने ५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता परिसरात घडली. सुनील मोतीराम कोडापे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुनील कोडापे हे आठ ते दहा मजुरांसह मौजा चक कन्हळगाव येथील शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. सर्वजण कामात व्यस्त असताना अचानक वाघाने सुनील यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जवळच काम करणाऱ्या मजुरांनी आरडाओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर जखमी शेतकऱ्याला तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी महेशकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्याची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून वनविभागाच्या वतीने तातडीची मदत म्हणून १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. ही घटना वनविभागाच्या कक्ष क्रमांक ३० मध्ये घडल्याचे सांगण्यात आले.

मूल तालुक्यात यंदा अनियमित पावसामुळे शेतीचे गणित आधीच बिघडले आहे. त्यातच आता शेतात काम करताना वाघाच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी आणि मजुरांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने शेतकरी कुटुंबांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

दाबगाव मक्ता, चक कन्हाळगाव आणि परिसरात वाघाचा वावर असल्याने वनविभागाने गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





  Print






Related Photos