आनंदाच्या क्षणांसाठी संपूर्ण कुटुंब मुंबईला विवाह सोहळ्यात सहभागी


विदर्भ न्यूज एक्सपरीस
तालुका प्रतिनिधी / चंद्रपूर : आनंदाच्या क्षणांसाठी संपूर्ण कुटुंब मुंबईला विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र, इकडे त्यांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत आयुष्यभराच्या कष्टातून जमवलेला लाखोंचा ऐवज लंपास केला. वरोरा शहरातील करंजी विला परिसरात घडलेल्या या धक्कादायक घरफोडीत तब्बल २६ लाख ८७ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
समिना अलीअसगर बोहरा (२५) या आपल्या कुटुंबीयांसह १ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील मौल्यवान दागिने आणि रोकड चोरून नेली.
५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कुटुंबीय घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश करताच अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आणि तुटलेले कपाट पाहून त्यांना मोठा धक्का बसला. तपासणी केली असता सुमारे ४२ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि १० लाख २४ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे लक्षात आले. चोरी गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत २६ लाख ८७ हजार रुपये आहे.
आनंदाने घराबाहेर पडलेल्या कुटुंबाला परतल्यानंतर घरफोडीच्या कटू वास्तवाला सामोरे जावे लागले. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान आता वरोरा पोलिसांसमोर आहे.
Related Photos




Petrol Price




