महत्वाच्या बातम्या

 धानोऱ्यात तंबाखूविरोधी धडक कारवाई : १६ हजार ३०० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून धानोरा शहरात मुक्तिपथ अभियान, पोलिस विभाग आणि एनसीडी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान कोटपा (COTPA) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पाच पानठेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर एका घरावर छापा टाकून १६ हजार ३०० रुपयांचा बेकायदेशीर सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेक पानटपऱ्यांनी तत्काळ शटर डाऊन केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा शहरातील विविध भागांत पथकाने अचानक तपासणी मोहीम सुरू केली. तपासणीदरम्यान सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या तसेच कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पाच पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली. संबंधित विक्रेत्यांकडून दंड वसूल करून त्यांना कायद्याचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, एका घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ छापा टाकला. छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर सुगंधित तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचा शहरात मोठा परिणाम दिसून आला. दंडात्मक कारवाई आणि घरावर पडलेल्या छाप्यामुळे अवैध तंबाखू विक्रेते चांगलेच धास्तावले. कारवाईची माहिती शहरभर पसरताच मुख्य चौकांसह अनेक भागांतील पानटपऱ्या काही वेळातच बंद झाल्या. दिवसभर शहरात पानठेल्यांवर कमालीचा शुकशुकाट दिसून आला.

तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच नागरिकांनी तंबाखूमुक्त समाज घडविण्यासाठी सहकार्य करावे आणि बेकायदेशीर तंबाखू विक्रीची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos