महत्वाच्या बातम्या

 वनपट्टा मंजुरी व दुरुस्ती अभियानाची मुदत आणखी एक महिना वाढवा 


- दुर्गम भागातील नागरिकांना पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आजाद समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधान सचिवांना निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने वनपट्टे मंजुरी तसेच वनपट्ट्यांमधील दुरुस्तीच्या अनुषंगाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबविले आहे. मात्र, गडचिरोली सारख्या भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण, दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात एवढा अल्प कालावधी अपुरा ठरत असल्याने या अभियानाची मुदत किमान आणखी एक महिना वाढविण्यात यावी, अशी मागणी आजाद समाज पार्टी, गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे व पाडे दुर्गम व अतिदुर्गम भागात आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट तसेच प्रशासकीय यंत्रणेपर्यंत माहिती पोहोचण्याच्या अडचणी आहेत. त्यामुळे अभियानाची माहिती प्रत्येक पात्र वनहक्कधारकापर्यंत पोहोचविणे, आवश्यक कागदपत्रे जमा करणे आणि वनपट्ट्यांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे.

अल्प कालावधीमुळे पात्र नागरिकांचे दावे किंवा दुरुस्तीची प्रकरणे केवळ वेळेअभावी प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या अभियानाचा उद्देशच बाधित होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आजाद समाज पार्टीने शासनाकडे अभियानाची मुदत किमान एक महिना वाढविण्यासोबतच दुर्गम गावांमध्ये विशेष शिबिरे घेण्याची, ग्रामसभा व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याची, वनपट्ट्यांमधील नाव, क्षेत्रफळ, सर्व्हे क्रमांक, नकाशा आदी त्रुटींच्या दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.

तसेच इंटरनेट किंवा नेटवर्कच्या अभावामुळे नागरिकांना अर्ज करता न आल्यास त्यांना वंचित राहावे लागू नये यासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची व प्रत्यक्ष मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी पक्षाने केली आहे. गडचिरोलीतील आदिवासी व पारंपरिक वननिवासी नागरिकांच्या हक्काशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन शासन स्तरावर प्रस्ताव पाठवावा आणि अभियानाचा कालावधी किमान एक महिना वाढवून पात्र नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आजाद समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, युवा तालुकाध्यक्ष नितेश वेसकडे, आणि जिल्ह्यातील नागरिकांनी केली.





  Print






Related Photos