चंद्रपुरात एमडी पावडर विक्री करणारा युवक जेरबंद : रामनगर पोलिसांची मोठी कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मानवी मनोव्यापारावर परिणाम करणारी गुंगीकारक एमडी पावडर (मेथाडोन) विक्रीसाठी आणणाऱ्या एका युवकाला रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्याच्याकडून सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.समीर शेख साबीर शेख (वय २६), रा. बगडखिडकी, अरबी मदरसा जवळ, चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
रामनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक बगडखिडकी रेल्वे गेट परिसरात अवैध धंदे व अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात गस्त घालत असताना गुप्त माहिती प्राप्त झाली. त्यानुसार प्रितम पानठेल्याजवळ एक युवक मोटारसायकलवर एमडी पावडर विक्रीच्या उद्देशाने थांबला असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव समीर शेख साबीर शेख (वय २६), रा. बगडखिडकी, अरबी मदरसा जवळ, चंद्रपूर असे सांगितले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १५.०९ ग्रॅम एमडी पावडर (मेथाडोन) किंमत ७५ हजार रुपये, एक मोबाईल फोन व मोटारसायकल असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपीने सदर अंमली पदार्थ अन्य एका व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) व २९ अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७२७/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद बौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा नेतृत्वात गुन्हे अन्वेषन पथकातील पोउपनि. कृष्णा दराडे, पोहवा रामप्रसाद नैताम, पोहवा आंनद खरात, पोहवा प्रकाश बलकी पोहवा शरद कुडे, पोहवा बाबा नैताम पोहवा जितेंद्र आकरे, पोअं प्रकाश मडावी, पोअं संदिप कामडी, पोअ. पंकज ठोंबरे, पोअं. सुरेश कोरवार, पोअं रविकुमार डेंगळे, पोअं पंकज पोंदे,तसेच मपोअं ब्ल्युटी साखरे यानी केले.
अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील रामनगर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, या प्रकरणाच्या तपासातून आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




