मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्रातले मच्छिमार बांधव हे दररोज उत्तुंग लाटांशी सामना करुन आपला जीव धोक्यात घालून आपला मच्छिमारीचा व्यवसाय करतात. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगाबरोबरच मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ससून डॉक येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले.
गेल्या काही काळात एनडीआरएफ मार्फत मच्छिमारांचे नुकसान झाल्यास त्यांना देण्यात येणारी मदत कमी असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे मदतीबाबतचे निकष बदलण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी १० लोकांच्या मच्छिजाळीचे नुकसान झाले होते. १० मच्छिमारांची जाळी जळाल्याने त्यांना मत्स्यव्यवसाय करण्यास अडचण येत होती. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या १० मच्छिमारांना जाळीसाठी ५४ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येतील असे या कार्यक्रमात जाहीर केले.
मच्छिमारांसाठी मत्स्यव्यवसाय विषयक कल्याणकारी योजनांच्या लाभासंबंधी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सागर परिक्रमेचा सांगता समारंभ (तृतीय चरण) कार्यक्रम मुंबई शहर जिल्हयातील नवीन भाऊचा धक्का येथे मंगळवारी २१फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला असून येणाऱ्या काळात पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्याचे काम राज्य शासन प्राधान्याने करणार आहे. याशिवाय मुंबईतील कोळीवाड्यांचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा पुनर्विकास यालाही प्राधान्य देण्यात येईल. दर्याचा राजा अशी ओळख असणाऱ्या कोळीबांधवांचा विकास, त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा यासह त्यांची सुरक्षा याला सुध्दा आगामी काळात प्राधान्य देण्यात येईल. डिझेल परतावा, कोल्ड स्टोरेजची सुविधा यासारखे प्रश्न मार्गी लावण्यात येतील.
News - Rajy