बल्लारपुरात कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक उघड : ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कत्तलीच्या उद्देशाने जनावरांना निर्दयतेने वाहनात डांबून अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा प्रकार बल्लारपूर पोलिसांनी उघडकीस आणला. नगर परिषद चौक परिसरात नाकाबंदी करून पोलिसांनी एका पिकअप वाहनातून दोन म्हशी आणि पाच रेड्यांची सुटका केली. या कारवाईत जनावरांसह पिकअप वाहन असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १८ नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आली.
या प्रकरणी सैयद मुबारक सैयद राजमोहमद ३३ वर्ष, रा. इस्लामपुरा वार्ड, वणी, फिरोज रसुल शेख २८ वर्ष, रा. रंगनाथनगर वार्ड, वणी आणि सैयद गुलाम नबी सैयद रियाज अली ३० वर्ष, रा. रंगनाथनगर, वणी, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी एमएच २९ सीएम १४६० क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पाच रेडे आणि दोन म्हशी अत्यंत आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना व वैद्यकीय प्रमाणपत्र मागितले असता संबंधितांकडे ते नसल्याचे समोर आले.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत जनावरांना क्षमतेपेक्षा अधिक संख्येने वाहनात कोंबण्यात आले होते. तसेच चारा-पाणी आणि औषधोपचाराची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. या निर्दयी वाहतुकीमुळे जनावरांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. दोन म्हशींची किंमत ६५ हजार रुपये, पाच रेड्यांची किंमत ७५ हजार रुपये, तर पिकअप वाहनाची किंमत पाच लाख रुपये, असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शब्बीरखांन पठाण, पोलीस हवालदार संदेश वाघमारे, पोलीस अंमलदार अंकुश बुरांडे , सुजीत आणि साईनाथ यांच्या पथकाने केली. याप्रकरणी प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली.




Petrol Price




