महत्वाच्या बातम्या

 पाच महिन्यांचा पगार काढून देण्यासाठी २५ हजारांची लाच : पोंभुर्णा आयटीआयच्या प्राचार्यांसह लिपिक एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पाच महिन्यांचे मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारताना पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांसह कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सोमवारी (२३ नोव्हेंबर) करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये कल्पना संजय खोब्रागडे (५५), प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोंभुर्णा आणि नरेंद्र चंद्रशेखर मलिक (४७), कनिष्ठ लिपिक, यांचा समावेश आहे. तक्रारदार महिला (३१) या पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर शिल्पनिदेशक म्हणून कार्यरत आहेत. त्या वायरमन विषयाचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देतात. त्यांना सैद्धांतिक विषयासाठी प्रतितास २५० रुपये, तर प्रात्यक्षिकासाठी प्रतितास १२५ रुपये मानधन दिले जाते. मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ या पाच महिन्यांचे एकत्रित मानधन नोव्हेंबर महिन्यात देण्यात आले होते.

हे पाच महिन्यांचे मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांनी कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलिक याच्यामार्फत तक्रारदार महिलेकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने २१ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने २२ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांनी ३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. ही रक्कम २३ नोव्हेंबर रोजी संस्थेतील कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलिक याच्याकडे देण्यास सांगितले. लिपिक मलिक यानेही लाचेची मागणी करण्यास प्रोत्साहन देत रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

त्यानुसार सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सापळा रचला. तक्रारदार महिलेने प्राचार्यांनी सांगितल्यानुसार २५ हजार रुपयांची लाच कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलिक याच्याकडे दिली. त्याने पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणात प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांच्यासह दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांच्या अटकेची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. सदर कारवाई लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिटट्टावार यांचा नेतृत्वात पोलीस निरीक्षक तेजराम मेश्राम, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार, स. फौ. मनोज रामटेके, पो. हवा. हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पो.शि. अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम, महेश माहुरपवार, ज्ञानेश्वर डोकळे, सचिन गजभिये, म.पो.शि. सिमा झाडे, चा.पो.शि. सतिश सिडाम यांनी केले.






  Print






Related Photos