महत्वाच्या बातम्या

 बारव्हा गावात बिबट्याचा शिरकाव : हल्ल्यात तीन शेळ्या ठार, पशुपालकांचे ३० हजारांचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा गावाच्या मध्यवस्तीत बिबट्याने शिरकाव करून तीन शेळ्यांवर हल्ला करत त्यांना ठार केले. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या हल्ल्यात तीन पशुपालकांचे सुमारे ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, गावाच्या मध्यवस्तीतच बिबट्याचा वावर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी पशुपालकांनी आपल्या शेळ्या चराईसाठी नेल्यानंतर सायंकाळी त्यांना घराशेजारी बांधून ठेवले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात धनराज लंजे, देवा केवळराम बुद्धे आणि राजकुमार मणिराम झोडे यांच्या प्रत्येकी एका शेळीचा मृत्यू झाला. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी पशुपालक शेळ्यांना सोडण्यासाठी गेले असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या. हा प्रकार पाहून पशुपालकांना मोठा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मृत शेळ्यांचा पंचनामा केला. वनविभागाच्या प्राथमिक तपासणीत शेळ्यांवर बिबट्यानेच हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे संबंधित पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत व भरपाई देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, बारव्हा परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वीही गाव परिसरात अस्वलाचे दर्शन झाले होते. आता गावाच्या मध्यवस्तीत बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर अवलंबून असून, शेळ्या हे त्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. अशा परिस्थितीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे पशुपालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने बारव्हा गाव परिसरात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, त्याच्या बंदोबस्तासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याशिवाय नुकसानग्रस्त पशुपालकांना तातडीने आर्थिक भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos