महत्वाच्या बातम्या

 इरई नदी संरक्षणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार मैदानात : रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत संरक्षक भिंतीच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील रहमत नगर परिसरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या संरक्षणासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी इरई नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रामसेतूपासून ते चौराळा पुलापर्यंत प्रथम टप्प्यात संरक्षक भिंत उभारण्याच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत स्थळाची पाहणी करत आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.

इरई नदी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती, नदीकाठावरील मातीचे होणारे क्षरण आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ही संरक्षक भिंत अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रस्तावित कामामुळे रहमत नगर परिसरातील नागरिकांना भविष्यातील संभाव्य धोक्यांपासून मोठा दिलासा मिळणार असून नदी परिसराच्या दीर्घकालीन संरक्षणालाही गती मिळणार आहे.

पाहणीदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संरक्षक भिंतीचा प्रस्तावित मार्ग, बांधकामाची व्याप्ती आणि तांत्रिक बाबींवर संबंधित अभियंत्यांसोबत सखोल चर्चा करून कामाचा आराखडा अंतिम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नदीच्या सकल भागामध्ये माती भरण्याचे काम तसेच सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत तयार करण्यात यावे, अशी सूचना करत या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही आमदार मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला लवकरच गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या पाहणी दौऱ्यावेळी महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्षा मनस्वी गिरे, नगरसेवक रवी लोणकर, प्रज्वलंत कडू, अजहर शेख, राहुल पावडे यांच्यासह राजीव गोलीवार, डॉ. मंगेश गुलवाडे, चांद सय्यद, ब्रिजभूषण पाझारे, सुरज पेदुलवार तसेच रहमत नगर परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार सातत्याने पुढाकार घेत असून, शहरातील वाढत्या गरजा, नागरिकांची सुरक्षितता आणि भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांचा कायम भर राहिला आहे. विकासाच्या प्रत्येक विषयाकडे केवळ प्रशासकीय काम म्हणून नव्हे, तर चंद्रपूरच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठीची जबाबदारी म्हणून ते पाहत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos