आगामी जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करा : सकल ओबीसी समाजाचा आज गडचिरोलीत मोर्चा


- शिवाजी महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुपारी १ वाजता मोर्चा; जिल्हाभरातील ओबीसी समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची स्वतंत्र नोंद करण्यासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सकल ओबीसी समाज, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा दुपारी १ वाजता शिवाजी महाविद्यालय येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. आगामी जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद होण्यासह समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे, हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे.
सन २०२७ मध्ये व्यक्ती व कौटुंबिक जनगणना होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या लोकसंख्येची स्वतंत्र व अचूक नोंद होणे आवश्यक असल्याची भूमिका समाजाच्या वतीने मांडण्यात येत आहे. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट केल्यास समाजाची लोकसंख्या आणि सामाजिक परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांना शासनदरबारी योग्य स्थान मिळावे आणि आगामी जनगणनेच्या प्रक्रियेत समाजाची स्वतंत्र ओळख व लोकसंख्येची नोंद सुनिश्चित व्हावी, यासाठी या मोर्चाच्या माध्यमातून एकजूट दाखविण्यात येणार आहे. या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजातील नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी एकजुटीने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल ओबीसी समाज, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




