महत्वाच्या बातम्या

 गोंदियाच्या इतिहासात पहिल्यांदाच नझूल जमिनीचे विनामूल्य वर्ग-१ मध्ये रूपांतर


- आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश; दिवाळीपूर्वी शहरवासीयांना मोठा दिलासा

- ६ नोव्हेंबर रोजी शेकडो सिंधी समाज बांधवांना जमिनीच्या भाडेपट्ट्यांचे वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शहरातील नझूल जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या जमिनीच्या मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोंदिया शहरातील नझूल जमिनीचे कोणतेही मूल्य न आकारता वर्ग-१ जमिनीत रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून जमिनीच्या मालकी हक्काच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांसाठी ही महत्त्वाची भेट ठरली आहे.

गोंदिया शहरात अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या नझूल जमिनीवर वास्तव्यास आहेत. मात्र, जमिनीचा मालकी हक्क नसल्यामुळे या नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. यासंदर्भात नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. आमदार विनोद अग्रवाल यांनी हा प्रश्न शासनदरबारी सातत्याने मांडून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, नझूल जमिनीचे विनामूल्य वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिंधी समाजाच्या नागरिकांना ६ नोव्हेंबरला भाडेपट्ट्यांचे वितरण -
स्वातंत्र्याच्या काळात विस्थापित होऊन गोंदियात स्थायिक झालेल्या सिंधी समाजातील अनेक कुटुंबे आजही जमिनीच्या मालकी हक्कापासून वंचित होती. अनेक वर्षांपासून या समाजाकडून जमिनीचे भाडेपट्टे आणि मालकी हक्क मिळण्याची मागणी केली जात होती. यापूर्वीही या प्रश्नावर विविध स्तरांवर प्रयत्न झाले; मात्र ठोस तोडगा निघाला नव्हता.

आमदार विनोद अग्रवाल यांनी या प्रश्नाला प्राधान्य देत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून शेकडो सिंधी समाज बांधवांना जमिनीचे भाडेपट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ६ नोव्हेंबर रोजी आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते शेकडो लाभार्थ्यांना भाडेपट्ट्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील १८ हजार नागरिकांना यापूर्वीच पट्ट्यांचे वाटप -
जमिनीच्या हक्कांपासून वंचित असलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी ग्रामीण भागातही प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील वस्ती असलेल्या क्षेत्रातील सुमारे १३ हजार रहिवाशांना, तर अतिक्रमित क्षेत्रातील सुमारे ५ हजार नागरिकांना जमिनीचे पट्टे वितरित करण्यात आले आहेत.

या वितरण कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान आमदार अग्रवाल यांनी गोंदिया शहरातील नझूल जमिनीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न उपस्थित करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनस्तरावर झालेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

वनजमिनीवरील अतिक्रमणधारक आणि टंकपर येथील नागरिकांसाठीही प्रयत्न -
दरम्यान, १९९६ पूर्वीपासून झुडपी वनजमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना तसेच टंकपर परिसरातील सिंधी समाजाच्या नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठीही आमदार विनोद अग्रवाल यांचे प्रयत्न सुरू आहेत. या नागरिकांच्या जमिनीच्या प्रश्नावर शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांना नियमित भाडेपट्टा हक्क मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. अनेक वर्षांपासून जमिनीच्या हक्कांसाठी प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देणे हे आपले प्राधान्य असल्याचे आमदार अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.

गोंदिया शहरातील नझूल जमिनीच्या प्रश्नावर झालेला हा निर्णय आणि सिंधी समाज बांधवांना मिळणारे भाडेपट्टे यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनीच्या हक्कांच्या प्रश्नाला मार्ग मिळाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.





  Print






Related Photos