महत्वाच्या बातम्या

 दुचाकी अपघातात युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू


- चिंधी माल फाट्याजवळील भीषण अपघातात शेखर भजनकर यांचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात घडली दुर्घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीडजवळील चिंधी माल फाट्याजवळ पंजाबी ढाब्यासमोर रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने एका युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री सुमारे ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. शेखर आबाजी भजनकर असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेखर भजनकर हे शनिवारी रात्री आपल्या दुचाकीने नागभीडहून चिंधी मालच्या दिशेने जात होते. ते चिंधी माल फाट्याजवळ पोहोचले असता पंजाबी ढाब्यासमोर रस्त्याच्या कडेला एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता. ट्रकमध्ये बिघाड झाल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, रात्रीची वेळ असल्याने परिसरात अंधार होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचा शेखर यांना योग्य अंदाज आला नसल्याने त्यांची दुचाकी थेट ट्रकवर जाऊन आदळली. धडक एवढी जोरदार होती की, शेखर यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची तीव्रता पाहून परिसरात काही काळ खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने घटनेची माहिती संबंधित पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असून अपघाताचा पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी नादुरुस्त वाहनांबाबत खबरदारीची गरज -
रस्त्याच्या कडेला नादुरुस्त वाहन उभे असताना रात्रीच्या वेळी इतर वाहनचालकांना ते स्पष्टपणे दिसावे, यासाठी रिफ्लेक्टर, पार्किंग लाईट किंवा चेतावणी चिन्हांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः वर्दळीच्या मार्गावर अशा प्रकारे वाहन उभे असल्यास मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण होतो. चिंधी माल फाट्याजवळील या अपघातामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

युवकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ -
शेखर आबाजी भजनकर यांच्या आकस्मिक मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. युवकाच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघाताची नेमकी कारणे आणि परिस्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.





  Print






Related Photos