जुन्नर हद्दीतील मंचर येथील प्रकार : चार बिबट्यांचा भुकेने तडफडून मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : पुणे जिह्यातील जुन्नर वन विभागाच्या हद्दीत मंचर व शिरुर भागात गेल्या चार महिन्यांत चार बिबटे मृतावस्थेत आढळल्याने चिंता व्यक्त होत असतानाच आता शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे. या चारही बिबट्यांचा मृत्यू भुकेने तडफडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंचरमध्ये ५ आणि ८ मार्चला बिबट्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या शवविच्छेदनातून काही समान बाबी आढळून आल्या आहेत. या दोन्ही बिबट्यांनी तीन ते चार दिवस काहीच खाल्ले नव्हते, असे मंचरच्या वनक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले.
मंचरमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्यांच्या बरगड्या आणि इतर अवयव नाजूक होते. त्याच्या शरीरात आम्हाला अन्न सापडले नाही. त्याचा मृत्यू भुकेने झाल्याचे त्यावरून स्पष्ट होते, असे कळंबच्या पशुचिकित्सा अधिकारी वृशाली म्हस्के यांनी सांगितले.
वर्चस्वासाठी बिबट्यांमध्ये संघर्ष
गेल्या दोन वर्षांत आम्ही या विभागात बिबट्यांमधील संघर्ष पाहिला आहे. एखाद्या प्रदेशावरील वर्चस्वासाठी बिबट्यांमध्ये संघर्ष होतो. गेल्या २ वर्षांत हा संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढला आहे. असे याआधी कधीही घडले नव्हते. यातून पर्यावरणाचे बिघडते संतुलन अधोरेखित होते, असे जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी नमूद केले. तरुण आणि वृद्ध बिबट्यांकडे स्वतःचे वर्चस्व असलेला प्रदेश नसतो. त्यामुळे त्यांना शिकार मिळत नाही. शिकार करू शकणाऱ्या बिबट्यांनी सर्वाधिक भागावर वर्चस्व मिळवले आहे. जंगलात प्राण्यांची संख्या अधिक असल्यास अशी परिस्थिती उद्भवते. जुन्नरमध्ये बिबट्यांची घनता अधिक आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही तज्ञांचा सल्ला घेत आहोत, असे सातपुते पुढे म्हणाले.
News - Rajy