महत्वाच्या बातम्या

 उद्योगविश्वाची प्रत्यक्ष ओळख : बीआयटीच्या १०४ विद्यार्थ्यांची सिपेटला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वाची ओळख व्हावी, यासाठी बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला. विभागातील बी.टेक. आणि डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या १०४ विद्यार्थ्यांनी २८ सप्टेंबर रोजी सिपेट (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी), चंद्रपूर येथे औद्योगिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, पॉलिमर प्रक्रिया, औद्योगिक उपकरणे आणि विविध तांत्रिक प्रक्रियांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. प्रत्यक्ष कार्यप्रणाली जवळून पाहता आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञान आणि उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज यातील संबंध समजून घेण्याची संधी मिळाली.

उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेत विद्यार्थ्यांनी विविध प्रक्रियांविषयी उत्सुकतेने जाणून घेतले. भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि उद्योगक्षेत्रात आवश्यक असलेल्या कौशल्यांची जाणीव होण्यासही या भेटीचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. प्रशांत वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली या औद्योगिक भेटीचे नियोजन करण्यात आले. पॉलिटेक्निकचे विभागप्रमुख मोहसीन, प्रा. राहुल भोयर आणि प्रा. मयूर इतनकर यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. शिक्षकेतर कर्मचारी धनंजय पाठक, शैलेश रायपुरे आणि नितीन गिलबिले यांनीही सहकार्य केले.

या उपक्रमासाठी सिपेटचे संचालक प्रवीन बी. बच्छाव आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी पुष्कर देशमुख यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सिपेटमधील तांत्रिक व औद्योगिक प्रक्रियांची सविस्तर माहिती घेता आली. विभागप्रमुख प्रा. प्रशांत वाळके यांनी याबद्दल सिपेट प्रशासनाचे आभार मानले. बीआयटीचे अध्यक्ष संजय वासाडे, संचालक डॉ. रजनीकांत, पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्रीकांत गोजे, अकॅडमिक्सचे डीन डॉ. सत्यनारायण आणि रिसर्चचे डीन डॉ. खान यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानासोबतच त्यांच्यात उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी अशा प्रत्यक्ष औद्योगिक भेटी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.





  Print






Related Photos