गटई स्टॉल लाभार्थी व स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांच्या घरी आशीर्वादाचा दीप प्रज्वलित


- समाज कल्याण विभागाचा सेवाभावी उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गटई स्टॉल वाटप योजनेच्या लाभार्थ्यांच्या स्टॉलला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन आशीर्वादाचा दीप प्रज्वलित करण्यात आला.
अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गटई स्टॉल वाटप योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेतलेल्या सारंग कळमकर आणि दिगांबर येवतकर यांच्या स्टॉलला समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या व्यवसायाची पाहणी करून योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीबाबत माहिती जाणून घेण्यात आली.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थी वंशिका बावने यांच्या घरीही अधिकाऱ्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान आशीर्वादाचा दीप प्रज्वलित करून लाभार्थ्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचविणे आणि लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क वाढविणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
या उपक्रमात समाज कल्याण कार्यालयाचे अधीक्षक दीपक कुसरे, पी. पी. साटोणे आणि दीपक कुकाडकर यांनी लाभार्थ्यांच्या स्टॉल व घरी भेट देऊन आशीर्वादाचा दीप प्रज्वलित केला.समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन लाभार्थ्यांनी आर्थिक व शैक्षणिक प्रगती साधावी, तसेच शासनाच्या योजनांची माहिती अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी अशा प्रत्यक्ष भेटींचे आयोजन करण्यात येत असल्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे.




Petrol Price




