महत्वाच्या बातम्या

 रुग्णांची मोठी गैरसोय : खाटेवरूनच करावा लागला रुग्णालयापर्यंत प्रवास


- लाहेरी परिसराची दुरावस्था पुन्हा एकदा उघड; रस्ते व पुलाअभावी ग्रामस्थांचा जीवघेणा संघर्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७८ वर्षे पूर्ण झाली असली, तरी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी परिसरातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. रस्ते, पूल आणि वाहतूक सुविधांचा अभाव असल्याने गंभीर आजारी रुग्णांना खाटेवरून उचलून नदी-नाले पार करत रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. अशाच एका घटनेने लाहेरी परिसरातील विकासाची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

लाहेरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बंगाडी गावातील रहिवासी संतोष जेट्टी (वय २१) यांची अचानक प्रकृती गंभीर बिघडल्याने कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे ठाकले. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता, नदीवर पूल किंवा कोणतीही वाहन सुविधा उपलब्ध नसल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी संतोष जेट्टी यांना खाटेवर झोपवून नदी-नाले ओलांडत मुख्य मार्गापर्यंत आणले. अनेक किलोमीटरचा हा प्रवास अत्यंत कठीण आणि जीव धोक्यात घालणारा ठरला.

घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाची रुग्णवाहिका गुंडेनूर नाल्यापर्यंत पोहोचली. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार केले. प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात आल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

बंगाडी हे गाव लाहेरीपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असून येथे ३० ते ४० घरांची वस्ती आहे. मात्र आजही या गावात सर्व हंगामात सुरू राहील असा रस्ता, नदीवरील पूल, नियमित वाहतूक व्यवस्था तसेच पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते.

या घटनेमुळे लाहेरी परिसरातील रखडलेली विकासकामे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वेळेत रस्ते व गुंडेनूर मार्गावरील पूलाचे बांधकाम पूर्ण झाले असते, तर गंभीर रुग्णाला खाटेवरून वाहून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली नसती, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, ग्रामस्थांनी प्रशासनाकडे गुंडेनूर मार्गावरील रखडलेले पूल बांधकाम तातडीने पूर्ण करावे, बंगाडीसह परिसरातील गावांना सर्व हंगामात सुरू राहील असा रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच आरोग्य आणि वाहतूक सुविधांचा विस्तार करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. दुर्गम भागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos