महत्वाच्या बातम्या

 स्वाधार योजनेच्या जुन्या लाभार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी : लाभ नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन


- अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना वार्षिक ५० ते ५७ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य; शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /  गोंदिया : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यांना शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मागील वर्षी लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी लाभाचे नूतनीकरण करण्याची संधी देण्यात आली असून, संबंधित विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन अर्ज ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आधार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास, निर्वाह भत्ता आणि शैक्षणिक साहित्याच्या खर्चासाठी वार्षिक ५० हजार ते ५७ हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.

गोंदिया जिल्ह्यात आठ शासकीय वसतिगृहे कार्यरत -
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गोंदिया व अर्जुनी मोरगाव येथे कार्यरत आहे. तर मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह गोंदिया, नवीन गोंदिया (कुडवा), तिरोडा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी येथे सुरू आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण आठ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.

या वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, नाश्ता, भोजन, शैक्षणिक साहित्य आदी आवश्यक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो.

जिल्हा व तालुका स्तरानुसार आर्थिक सहाय्य -
या योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक ५७ हजार रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ५० हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या निवास, भोजन आणि इतर खर्चाची पूर्तता करण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरते.

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. मात्र, ज्या तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, अशा ठिकाणी शिक्षण घेणारे पात्र विद्यार्थी थेट स्वाधार योजनेसाठी अर्ज करू शकतात.

३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन -
मागील शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी चालू वर्षासाठी लाभाचे नूतनीकरण करण्याकरिता विहित प्रक्रियेनुसार ऑनलाइन अर्ज ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि योजनेचा लाभ घेण्याची संधी गमावू नये, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आले आहे.





  Print






Related Photos