नागपुरात बाईक टॅक्सीला अद्याप अधिकृत परवानगी नाही : अनधिकृत चालकांवर होणार कारवाई


- प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा; बाईक टॅक्सी सेवेचा वापर टाळण्याचे नागरिकांना आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर शहरात बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास राज्य शासन किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) यांच्याकडून अद्याप कोणत्याही कंपनीला अथवा सेवेला अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतानाही शहरात काही ठिकाणी अनधिकृतपणे बाईक टॅक्सी व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास येत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. विनापरवाना बाईक टॅक्सी सेवा चालविणाऱ्या चालकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. सध्या नागपूर शहरात बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कोणत्याही सेवेला अधिकृत मान्यता नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी नसताना दुचाकीवरून प्रवाशांची व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या चालकांनी अशा प्रकारचा व्यवसाय करू नये. नियमांचे उल्लंघन करून बाईक टॅक्सी सेवा चालविणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. प्रवाशांच्या जीविताशी आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. अधिकृत परवानगी नसलेल्या सेवेतून प्रवास केल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी केवळ अधिकृत आणि शासनमान्य वाहतूक सुविधांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनधिकृत बाईक टॅक्सी सेवेला प्रोत्साहन देऊ नका -
नागपूर शहरातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी आकर्षक भाडे किंवा जलद प्रवासाच्या आमिषाला बळी न पडता अनधिकृतपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेचा वापर टाळावा. तसेच अशा सेवांना प्रोत्साहन न देता शासनमान्य वाहतूक पर्यायांचा स्वीकार करावा, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. एकूणच, नागपूर शहरात बाईक टॅक्सी सेवेला अधिकृत परवानगी मिळेपर्यंत अशा प्रकारच्या व्यावसायिक प्रवासी वाहतुकीपासून चालकांनी दूर राहावे, तर नागरिकांनीही अनधिकृत सेवांचा वापर करू नये. नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.




Petrol Price




