महत्वाच्या बातम्या

 इटियाडोह प्रकल्पाच्या उन्हाळी हंगामाच्या पाणी नियोजनावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी!


- ५५ पाणी वापर संस्थांना विश्वासात न घेतल्याचा आरोप; उन्हाळी हंगाम रद्द करण्याची ८० टक्के संस्थांची मागणी, अधिकाऱ्यांसह प्रकल्पस्तरीय समितीविरोधात शेतकऱ्यांचा संताप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : इटियाडोह प्रकल्पाच्या सन २०२६-२७ च्या उन्हाळी हंगामातील पाणी नियोजनावरून पाणी वापर संस्था, संचालक मंडळ आणि संबंधित अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला असून, प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेतकरी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उन्हाळी हंगामासाठी क्षेत्र मंजूर करताना सर्व पाणी वापर संस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही, तसेच संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांना प्रकल्पस्तरीय बैठकीची पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी मौजा अर्जुनी येथे आयोजित प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या तातडीच्या सर्वसाधारण सभेत अधिकारी व प्रकल्पस्तरीय समितीच्या कार्यपद्धतीवर संस्थांचे अध्यक्ष, संचालक आणि शेतकरी वर्गाने तीव्र आक्षेप नोंदविला.

या सभेला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सोनुले, अर्जुनी उपविभागीय अधिकारी बनसोडे, वडसा उपविभागाचे डहाणे, प्रकल्पाचे अध्यक्ष शिवनारायण पालीवाल, संचालक मंडळाचे सदस्य, विविध शाखांचे शाखा अधिकारी, पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव, संचालक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सभेमध्ये गोठणगाव, अर्जुनी, लाखांदूर, बारव्हा, कोरंभी, वडसा, कोंढाळा आणि आरमोरी या शाखांमधील उन्हाळी हंगामाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

५ हजार ५० हेक्टर क्षेत्राला उन्हाळी हंगामाची मंजुरी -
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या प्रकल्पस्तरीय बैठकीमध्ये सन २०२६-२७ च्या उन्हाळी हंगामासाठी एकूण ५ हजार ५० हेक्टर क्षेत्र मंजूर करण्यात आले होते. यामध्ये अर्जुनी उपविभागासाठी ३ हजार ३० हेक्टर, तर वडसा उपविभागासाठी २ हजार २० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर शाखानिहाय आणि संस्थानिहाय पाणी वितरणाचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या नियोजनात कालव्याच्या शेवटच्या टोकावर (टेलवर) असलेल्या संस्थांना वगळण्यात आल्याचा आरोप आहे. बारव्हा शाखा, कोंढाळा आणि आरमोरी परिसरातील जवळपास ३० पाणी वापर संस्थांना उन्हाळी हंगामाच्या नियोजनातून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच ज्या पाणी वापर संस्थांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे, अशा संस्थांना उन्हाळी हंगामासाठी पाणी देऊ नये, अशी भूमिकाही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोरंभीला १ हजार, तर वडसा शाखेला ८०० हेक्टर क्षेत्र -
वडसा उपविभागाच्या दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ च्या पत्रानुसार कोरंभी शाखेसाठी १ हजार हेक्टर, तर वडसा शाखेसाठी ८०० हेक्टर क्षेत्र उन्हाळी हंगामाकरिता मंजूर करण्यात आले. मात्र, पाण्याची उपलब्धता आणि भविष्यातील गरज लक्षात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामाचे नियोजन करणे योग्य आहे का, असा प्रश्न शेतकरी व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याची गरज -
जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ च्या पत्राचा संदर्भ देत शेतकऱ्यांनी पाणी नियोजनाबाबत चिंता व्यक्त केली. अल निनोचा प्रभाव ऑगस्ट २०२७ पर्यंत राहण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश शासनाने दिल्याचे सभेत नमूद करण्यात आले. प्रकल्पातील उपलब्ध पाणी हे केवळ उन्हाळी पिकांसाठीच नव्हे, तर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी, जनावरांसाठी आणि आगामी खरीप हंगाम २०२७ साठीही महत्त्वाचे आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उन्हाळी हंगामाचे नियोजन पुनर्विचार करून करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील चार धरणांपैकी तीन धरणे उन्हाळी हंगामासाठी पूर्णपणे बंद असल्याचे उदाहरण देत, इटियाडोह प्रकल्पावर मात्र उन्हाळी हंगाम सुरू करण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

५५ संस्थांना विश्वासात का घेतले नाही? -
दरवर्षी प्रकल्पस्तरीय बैठकीसाठी सर्व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना सूचना देण्यात येत असत. मात्र, यंदा प्रकल्पस्तरीय बैठकीबाबत अनेक संस्थांना पूर्वसूचना का देण्यात आली नाही, असा प्रश्न संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. प्रकल्पाच्या पाणी नियोजनासारख्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेताना सर्व ५५ पाणी वापर संस्थांना विश्वासात घेणे आवश्यक असताना, मोजक्या संचालक आणि अधिकाऱ्यांच्या स्तरावर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला. प्रकल्पस्तरीय समितीच्या मनमानी पद्धतीने कारभार चालणार असेल, तर ५५ पाणी वापर संस्थांची आवश्यकता काय, असा सवालही सभेत उपस्थित करण्यात आला. पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींना निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान मिळत नसेल, तर संस्थांच्या अस्तित्वाचा उपयोग काय, असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून सभेत नाराजी -
दिनांक २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेमध्ये उपविभागीय अधिकारी बनसोडे यांनी प्रकल्पस्तरीय समितीचा निर्णय अंतिम असेल, असे सर्व संस्थांच्या प्रतिनिधींना सांगितल्याचे उपस्थितांनी नमूद केले. या भूमिकेमुळे संस्थांचे अध्यक्ष, सचिव, संचालक आणि शेतकरी वर्गामध्ये नाराजी निर्माण झाली. लोकशाही पद्धतीने सर्व संस्थांच्या मतांचा विचार न करता समितीचा निर्णय अंतिम मानला जाणार असेल, तर संस्थांच्या प्रतिनिधींना सभेत बोलावण्यामागचा उद्देश काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. सभेदरम्यान उन्हाळी हंगाम सुरू करू नये, अशी भूमिका बहुतांश पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडली. जवळपास ८० टक्के संस्थांचा उन्हाळी हंगाम न घेण्याच्या बाजूने कल असल्याचे दिसून येताच प्रकल्पाचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि अधिकारी वर्गाकडून वेगळी भूमिका घेण्यात आल्याचा आरोपही शेतकरी प्रतिनिधींनी केला.

कालव्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी -
उन्हाळी हंगामाच्या पाणी नियोजनासोबतच कालव्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीचा प्रश्नही सभेत उपस्थित करण्यात आला. प्रकल्पाच्या कालव्यांमधून पाण्याचे योग्य वितरण होण्यासाठी आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली. कालव्यांची कामे अपूर्ण असताना पाणी नियोजनाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कितपत लाभ मिळणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी -
लाखांदूर आणि अर्जुनी तालुक्यांना शासनाने दुष्काळग्रस्त घोषित करून संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत व विविध सवलती दिल्या आहेत. मात्र, वडसा आणि आरमोरी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकल्पाच्या पाणी नियोजनामुळे काही भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. परिणामी पिके करपली, तर काही ठिकाणी रोगराईमुळे उत्पादनात घट झाली, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. त्यामुळे केवळ काही तालुक्यांपुरते मर्यादित न ठेवता गडचिरोली जिल्ह्यातील शेती परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आवश्यक सवलती द्याव्यात, अशी जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची मागणी असल्याचे सभेत सांगण्यात आले.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवता येत नसतील तर संचालकांनी राजीनामे द्यावेत! -
प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांमध्ये केवळ १८ संचालक आणि अधिकारी वर्गालाच सर्व अधिकार असतील, तर उर्वरित ५५ पाणी वापर संस्थांचे महत्त्व काय, असा थेट सवाल शेतकरी प्रतिनिधींनी उपस्थित केला. प्रकल्पावरील संचालकांची नियुक्ती नेमकी कोणत्या प्रक्रियेद्वारे होते आणि संस्थांच्या प्रतिनिधींना निर्णय प्रक्रियेत किती अधिकार आहेत, याबाबतही स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रकल्पाचे संचालक मंडळ तत्पर नसेल आणि शेतकऱ्यांच्या हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थाला महत्त्व दिले जात असल्याची भावना निर्माण होत असेल, तर संबंधित संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत. केवळ पद टिकविण्यासाठी संचालकपदावर राहू नये, अशी ठाम भूमिका पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी वर्गाने मांडली.

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन पाणी नियोजन करावे -
इटियाडोह प्रकल्प हा परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या शेती आणि उपजीविकेशी निगडित महत्त्वाचा सिंचन प्रकल्प आहे. त्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन करताना केवळ उन्हाळी हंगामाचा विचार न करता पिण्याच्या पाण्याची गरज, जनावरांसाठी पाणी, आगामी खरीप हंगाम, कालव्यांची सद्यस्थिती आणि सर्व पाणी वापर संस्थांचे हित यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. प्रकल्पस्तरीय समितीने कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व ५५ पाणी वापर संस्थांच्या अध्यक्ष, सचिव आणि प्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, उन्हाळी हंगामाच्या निर्णयाचा फेरविचार करावा, कालव्यांची कामे तातडीने सुरू करावीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सभेतून करण्यात आली. एकूणच, इटियाडोह प्रकल्पाच्या उन्हाळी हंगामाच्या पाणी नियोजनावरून निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र होत असून, शेतकरी व पाणी वापर संस्थांच्या मागण्यांवर प्रकल्प प्रशासन आणि संबंधित अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos