राजकला टॉकीज परिसरात झंडीमुंडी जुगारावर पोलिसांचा छापा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील राजकला टॉकीज परिसरात पानठेल्यालगतच्या खोलीत सुरू असलेल्या झंडीमुंडी जुगारावर चंद्रपूर शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते ७.१५ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी इमाम नुरुद्दीन तिघाले ३५ वर्ष , रा. बिनवा वार्ड, चंद्रपूर याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राजकला टॉकीजसमोरील इमाम पान सेंटरच्या बाजूच्या खोलीत छापा टाकण्यात आला. यावेळी कागदावरील विविध चित्रांवर पैसे लावून झंडीमुंडी जुगार खेळविला जात असल्याचे आढळले.
पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळण्यासाठी जमलेले इतर लोक घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, जुगार चालविणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळावरून जुगाराचे चित्र असलेला कागद, प्लास्टिकचे फलक, सात लोखंडी रिंग आणि रोख १ हजार ५० रुपये जप्त करण्यात आले. सदर कारवाई चंद्रपूर शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त केले.




Petrol Price




