अध्यात्मातून भक्ती, सेवाभाव आणि सदाचाराचा मार्ग प्रशस्त होतो : आ. किशोर जोरगेवार

- जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या दर्शन सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती; माता महाकालीची मूर्ती भेट देत केले स्वागत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अध्यात्म हे केवळ ईश्वरभक्तीचे माध्यम नसून माणसाला सदाचरण, सेवाभाव आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा प्रभावी मार्ग आहे. संत-महात्म्यांचे विचार आणि मार्गदर्शन माणसाला जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देतात. भक्तीच्या माध्यमातून माणसाने माणसाशी जोडले जावे, समाजात बंधुभाव, सद्भावना आणि सेवाभाव वृद्धिंगत व्हावा, हीच संतपरंपरेची शिकवण असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर येथील डगाव परिसरात जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना महाराजांचे अनमोल विचार आणि आध्यात्मिक मार्गदर्शन श्रवण करण्याची संधी मिळाली.
याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीची मूर्ती भेटस्वरूपात देऊन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे चंद्रपूर नगरीत स्वागत केले. माता महाकालीची मूर्ती भेट देत त्यांनी चंद्रपूरच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेप्रती आपला आदर व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाने आपल्या संस्कारांशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी जोडलेले राहणे अत्यंत आवश्यक आहे. अध्यात्म माणसाला केवळ स्वतःच्या उन्नतीचा विचार करायला शिकवत नाही, तर इतरांच्या दुःखात सहभागी होण्याची, गरजूंना मदतीचा हात देण्याची आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याची प्रेरणाही देते. संत-महात्म्यांच्या विचारांचे आचरण केल्यास समाजात सकारात्मकता, बंधुभाव आणि सद्भावनेचे वातावरण निर्माण होण्यास निश्चितच मदत होते.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनातून भक्ती, सेवा, सदाचार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे. त्यांच्या आध्यात्मिक विचारांमुळे अनेकांना जीवनात योग्य मार्गाने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या दर्शन सोहळ्यादरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित भाविक-भक्तांशी संवाद साधला. महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थितांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे विचार व मार्गदर्शन श्रवण करण्याचा लाभ मिळाला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राज्य कार्यकारिणी परिषद सदस्य तथा महामंत्री रविंद्र गुरुनुले, महामंत्री नामदेव डाहुले, बलराम डोडाणी, सुमीत बेले आदी मान्यवर उपस्थित होते. अखेरीस जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या चरणी विनम्र नमन करून त्यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, अशी मंगलकामना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.




Petrol Price




