वर्धा-सेवाग्राम परिसर धुक्याच्या विळख्यात : दृश्यमानता घटल्याने वाहनचालकांची कसरत


- रब्बी पिकांवर रोगराईचे सावट; ८ नोव्हेंबरला हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०७ वर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी, अशा बदलत्या वातावरणात आता वर्धा जिल्ह्यात धुक्याची दाट चादर पसरू लागली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत वर्धा-सेवाग्राम परिसर धुक्याच्या विळख्यात होता. रविवारी पहाटे सात वाजेपर्यंत दाट धुके कायम असल्याने परिसरातील दृश्यमानता कमालीची घटली होती. धुक्यात मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने रस्त्यावरील वाहनचालकांना वाहन चालविताना चांगलीच कसरत करावी लागली.
वर्धा-सेवाग्राम मार्गावर समोरून येणारे वाहनही स्पष्ट दिसत नसल्याने अनेक वाहनचालकांना वाहनांचे वायपर सुरू ठेवावे लागले. काही वाहनचालकांनी खबरदारी म्हणून वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली. सकाळीही धुक्याचे सावट कायम असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. परिणामी, सकाळच्या जनजीवनावरही धुक्याचा परिणाम जाणवला.
नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतरही आतापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत नव्हती. दिवसा कडक ऊन, तर रात्री हलकी थंडी असे वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट होऊ लागल्याने पहाटेच्या वेळी धुके दाटण्यास सुरुवात झाली आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांना आता थंडीची चाहूल लागली आहे.
रब्बी पिकांवर रोगराईचा धोका -
धुक्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत सातत्याने दाट धुके आणि हवेत ओलावा राहिल्यास पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. विशेषतः हरभरा आणि गहू पिकांच्या वाढीच्या अवस्थेत वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पहाटेच्या वेळी धुके कायम राहण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांचे हवामानाकडे लक्ष लागले आहे. आधीच बदलत्या हवामानाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता रब्बी पिकांच्या संरक्षणाची चिंता सतावत आहे.
८ नोव्हेंबरला वर्ध्याची हवा सर्वाधिक खराब -
दरम्यान, बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळातील हवेच्या गुणवत्तेची आकडेवारीही चिंताजनक ठरली आहे. ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान वर्ध्यातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सातत्याने चढ-उतार नोंदविण्यात आले. यामध्ये ८ नोव्हेंबर रोजी हवेचा गुणवत्ता निर्देशांक तब्बल ३०७ वर पोहोचला होता. भारतीय वायु गुणवत्ता निर्देशांकानुसार ३०१ ते ४०० हा स्तर अतिशय खराब श्रेणीत मोडतो. त्यामुळे या दिवशी वर्ध्यातील हवेची गुणवत्ता अतिशय खराब स्थितीत होती.
९ नोव्हेंबर रोजीही हवेचा गुणवत्ता निर्देशांक २६७ इतका नोंदविण्यात आला. फटाक्यांचा धूर, वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि हवामानातील बदल यांमुळे हवेतील प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर बनल्याचे चित्र आहे. एकीकडे पहाटे दाट धुके, तर दुसरीकडे हवेच्या गुणवत्तेतील घसरण यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच रब्बी पिकांवर रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांसह शेतकऱ्यांनाही जाणवू लागला आहे.




Petrol Price




