माणुसकीचे दर्शन! अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले दाम्पत्य आणि सामाजिक कार्यकर्ते

- आरमोरी–ब्रह्मपुरी मार्गावरील निलज गावाजवळ भीषण अपघात; एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरा जखमी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : दसऱ्याच्या दिवशी रात्री साधारणतः ९ ते १० वाजताच्या दरम्यान आरमोरी–ब्रह्मपुरी मार्गावरील निलज गावाजवळ भीषण अपघात घडला. आरमोरीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीवरील दोन युवकांची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातात महेश शंकर मोहुर्ले नवेगाव हुंडेश्वरी ता नागभीड जि.चंद्रपूर हा युवक गंभीर जखमी झाला, तर दूसरे अक्षय वसंता पांडव ह्या युवकाला किरकोळ दुखापत झाली. दुर्दैवाने, गंभीर जखमी युवकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
अपघात घडताच त्या मार्गाने आपल्या कुटुंबासह प्रवास करणाऱ्या अभिषेक परिहार रा.मेंड़की यां दाम्पत्याने घटनास्थळी थांबून माणुसकीचे दर्शन घडवले. स्वतःच्या पत्नी व मुलांसोबत असतानाही त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यास प्राधान्य दिले. ॲम्बुलन्स येईपर्यंत त्यांनी घटनास्थळी थांबून जखमींची काळजी घेतली आणि त्यांना ॲम्बुलन्समध्ये दाखल करण्यासाठी सहकार्य केले. या घटनेची माहिती मिळताच आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोड़े यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तत्परतेने पुढाकार घेत आरमोरी उपजिल्ह्या येथील ॲम्बुलन्स चालक विलास मेश्राम यांना संपर्क केला. चालक विलास यांनीही दसरा चा दिवस आणि जेवण करत असताना देखील फोन येताच तातडीने प्रतिसाद दिला आणि अवघ्या १० ते १४ मिनिटांच्या आत घटनास्थळी पोहोचून दोन्ही जखमींना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या संपूर्ण घटनेत त्या दाम्पत्याने दाखवलेली संवेदनशीलता, सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला तातडीचा समन्वय आणि ॲम्बुलन्स चालकाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालया पोहोचवण्यासाठी या सर्वांनी केलेले प्रयत्न म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, अशा संकटाच्या वेळी स्वतःच्या कुटुंबासोबत असतानाही अनोळखी व्यक्तींच्या मदतीसाठी थांबणाऱ्या नागरिकांमुळे समाजात माणुसकीवरील विश्वास अधिक दृढ होतो.
अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येणारे नागरिक, तत्परतेने सेवा देणारे ॲम्बुलन्स चालक आणि समन्वय साधणारे सामाजिक कार्यकर्ते हे समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत. या दाम्पत्यासह सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोड़े आणि ॲम्बुलन्स चालक विलास यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या घटनेतून एकच संदेश मिळतो अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी माणुसकीने पुढे या; कारण संकटाच्या क्षणी तुमची तत्परता एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मोलाची ठरू शकते.




Petrol Price




