महत्वाच्या बातम्या

 तीनही मार्ग रोखल्याने आष्टीत वाहतुकीची कोंडी : शेतकरी आंदोलनाने प्रशासनाची धावपळ


- गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम; सर्वांनाच अटक करा, पण गुन्हे मागे घ्या जेलभरोचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भूमिअधिग्रहण प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्याचे जिल्हा प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतरही वरद फेरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा प्रयत्न केल्याच्या घटनेवरून मुधोलीसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष शुक्रवारी आष्टीत उफाळून आला. या प्रकरणात सात शेतकऱ्यांसह ३० ते ४० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतप्त झालेल्या मुधोलीसह १३ गावांतील शेतकऱ्यांनी आष्टी पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करत अहेरी, चामोर्शी आणि चंद्रपूरकडे जाणारे तिन्ही मार्ग रोखून धरले. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. तब्बल नऊ तास चाललेल्या या आंदोलनामुळे पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

ड्रोन सर्वेक्षणावरून वादाची ठिणगी -
मुधोली चक क्रमांक २ येथे ९ जुलै रोजी वरद फेरो कंपनीचे कर्मचारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी आले होते. भूमिअधिग्रहण प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असतानाही सर्वेक्षणाचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. यावेळी ग्रामस्थांनी कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांना पकडून ग्रामपंचायतीत नेले होते.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या तिघांची सुटका करण्यात आली. बेकायदेशीररीत्या ड्रोन उडवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत डांबून ठेवल्याच्या आरोपावरून कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून सात शेतकऱ्यांसह ३० ते ४० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

नोटीस मिळताच १३ गावांतील शेतकरी आष्टीत -
या प्रकरणाच्या तपासासाठी ७ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्यात आली. नोटीस मिळताच मुधोलीसह १३ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने आष्टी पोलिस ठाण्यात पोहोचले. दाखल गुन्ह्यांबद्दल संताप व्यक्त करत त्यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या दिला. दुपारी १२.३० ते ३.३० वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक गाठला. दुपारी साडेतीन वाजल्यापासून चौकात ठिय्या देत अहेरी, चामोर्शी आणि चंद्रपूरकडे जाणारे तिन्ही मार्ग रोखून धरले.

तीनही मार्गांवर वाहनांच्या रांगा -
शेतकऱ्यांनी तिन्ही मार्ग रोखल्याने चौक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा सर्वांनाच अटक करा, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. गुन्हे मागे घेतल्याशिवाय एकही शेतकरी आंदोलनस्थळावरून हलणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

रुग्णवाहिकांना वाट मोकळी; आंदोलनात माणुसकीचे दर्शन -
तीनही मार्ग रोखून वाहतूक बंद केली असतानाही आंदोलकांनी रुग्णवाहिकांना अडवले नाही. अचानक आलेल्या रुग्णवाहिकांना तसेच खासगी वाहनातून रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना शेतकऱ्यांनी स्वतःहून वाट मोकळी करून दिली. आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत असतानाच रुग्णांची अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाची आंदोलनस्थळी चर्चा होती. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प असतानाही अत्यावश्यक सेवांना मार्ग देत आंदोलकांनी संयमाची भूमिका दाखविली.

महिला, युवक आणि विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग -
आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. महिला आंदोलक आघाडीवर राहून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. युवक आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन लांबल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच पाणी आणि जेवणाची व्यवस्था केली. दुपारपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी परस्पर सहकार्याने ही व्यवस्था सांभाळली.

आमदार नरोटे, एसपींकडून मनधरणी -
आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी फोनवरून संवाद साधला. आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, गुन्हे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबविणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. दरम्यान, चामोर्शीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपअधीक्षक हेमंत चांदेवार यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी आंदोलनस्थळी ठाण मांडून होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासोबतच आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

नऊ तासांनंतरही तोडगा नाही -
दुपारी १२.३० वाजता सुरू झालेले शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरूच होते. तब्बल नऊ तास आंदोलन सुरू राहूनही वृत्त लिहिपर्यंत प्रशासन आणि आंदोलकांमध्ये कोणताही ठोस तोडगा निघाला नव्हता. भूमिअधिग्रहणाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये आधीच असलेली नाराजी आणि त्यातच दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे आंदोलनाला अधिक धार आली. त्यामुळे आष्टीतील परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

शेतजमीन हेच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. जमीन गेल्यास त्यांचा आधार हिरावला जाईल. शेतकरी आपल्या हक्कासाठी लढत आहेत. गुन्हे दाखल करून प्रशासन कुटील डाव खेळत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला. दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे न घेतल्यास हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ब्राह्मणवाडे यांनी दिला. त्यामुळे आष्टीतील भूमिअधिग्रहणाचा प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेला शेतकरी-प्रशासन संघर्ष पुढील काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos