महत्वाच्या बातम्या

 आषाढी एकादशीनिमित्त पवनी, साकोलीत भक्तिरसाचा वर्षाव


- विद्यार्थ्यांच्या पालखी दिंडीने विठ्ठलनामाचा जागर; वारकरी परंपरा, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पवनी व साकोली येथील शैक्षणिक संस्थांमध्ये भक्ती, संस्कार आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या पालखी दिंडींचे उत्साहात आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, संतांच्या अभंगांच्या सुरेल निनादात आणि जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठलच्या अखंड जयघोषात परिसर भक्तिमय झाला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ तसेच वारकरी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

वैनगंगा विद्यालयात पारंपरिक पालखी दिंडी -
पवनी येथील वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची पारंपरिक पालखी दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. कपाळी चंदनाचा टिळा, हातात टाळ-मृदंग, मुखी विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि संतांच्या अभंगांनी विद्यालय परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. चिमुकल्यांच्या भक्तिरसपूर्ण सादरीकरणामुळे विदर्भाच्या काशीत जणू पंढरीच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.

कार्यक्रमाची सुरुवात वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव विनोद मेंढे, संचालिका भावना तर्वेकर, प्राचार्य अजय ठवरे, उपप्राचार्य प्रमोद मेश्राम, पर्यवेक्षक विकास रिनके तसेच ज्येष्ठ शिक्षक अविनाश नरहरशेट्टीवार यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली.

त्यानंतर पालखी दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक पद्धतीने मार्गक्रमण करू लागली. भगवान विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थिनींनी मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभाग नोंदवत वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला.

दिंडी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी रिंगण घालत संतांचे अभंग सादर केले. त्यांच्या सुरेल गायनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. समारोपानंतर विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाने विशेष परिश्रम घेतले.

नवजीवन कॉन्व्हेंटमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर -
साकोली तालुक्यातील जामनापूर येथील नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्येही आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पूर्व प्राथमिक विभागातील नर्सरी व केजी-१च्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई आणि वारकरी यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उपस्थितांची मने जिंकली.

टाळ, मृदंग, भगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि ज्ञानोबा-तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या जयघोषात विद्यालयाच्या प्रांगणातून वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. मार्गातील प्रत्येक चौकात विद्यार्थ्यांनी रिंगण घालत अभंग सादर केले. जय हरी विठ्ठलच्या अखंड गजराने परिसर भक्तिमय झाला, तर नागरिकांनीही दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती, एकात्मता आणि संस्कारांचा संदेश प्रभावीपणे दिला. कार्यक्रमाला व्यवस्थापक विनोद किरपान, प्राचार्या भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी सतीश गोटेफोडे तसेच पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, माधुरी हलमारे, रुपाली शेंडे, निशा देवगिरकर, शीला हरिणखेडे आणि योगिता मेंढे यांचे मार्गदर्शन लाभले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या दिंड्यांनी विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सामाजिक ऐक्य, भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेविषयी आदर निर्माण केला. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात निघालेल्या या पालखी दिंड्यांमुळे पवनी आणि साकोली परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.





  Print






News - Bhandara




Related Photos