अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिवीगाळ व मारहाण : तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील के मजरा रे येथे १७ वर्षीय विद्यार्थिनी व तिच्या वडिलांसोबत शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी राकेश नामे याच्याविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. ७ ऑगस्ट रोजी महाविद्यालयातून बसने गावाकडे परतत असताना राकेश नामे याने तिचे नाव घेऊन शिवीगाळ केली. तसेच चप्पलने मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून आल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.
घरी पोहोचल्यानंतर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर ती वडिलांसोबत राकेशच्या घराकडे जात असताना चांदणी वॉर्ड चौकाजवळ राकेश हातात लाकडी दांडा घेऊन आला. त्याने विद्यार्थिनीच्या वडिलांच्या हातावर दांड्याने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच विद्यार्थिनीच्या जांघेवर व मानेवर हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटनेत विद्यार्थिनीच्या पायाला दुखापत झाली असून तिच्या वडिलांच्या हाताला सूज आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद शांत केला. घटनेनंतर विद्यार्थिनीने वडिलांसोबत वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राकेश नामे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




