सेमानामध्ये विज्ञान पार्क अन् आता बोटिंगचीही सोय

- वनविभागाचा अभिनव उपक्रम : शिक्षण, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाला चालना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली वनविभागाच्या वतीने सेमाना पार्क येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक विज्ञान पार्क तसेच बोटिंग सुविधेचे लोकार्पण गुरुवार, ३० जुलै रोजी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या सुविधांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात विज्ञान, शिक्षण, मनोरंजन आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सेमाना पार्क हे गडचिरोलीतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ मानले जाते. या ठिकाणी विज्ञान पार्कची निर्मिती करून विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचा तसेच विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विज्ञानाशी संबंधित विविध आकर्षक उपकरणे आणि माहितीपूर्ण मांडणीमुळे हे पार्क विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ज्ञानवर्धक ठरणार आहे.
यासोबतच सुरू करण्यात आलेल्या बोटिंग सुविधेमुळे सेमाना पार्कच्या पर्यटन आकर्षणात मोठी भर पडली आहे. निसर्गरम्य वातावरणात बोटिंगचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार असून, त्यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुविधा विशेष आकर्षण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकार्पण समारंभाला मुख्य वनसंरक्षक जी. पी. नरवणे, उपवनसंरक्षक व्ही. एस. आर्या, सहायक वनसंरक्षक प्रवीण पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकार्पणानंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विज्ञान पार्कची सविस्तर पाहणी करून विविध वैज्ञानिक उपकरणे, माहितीफलक आणि उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. निसर्गाच्या सान्निध्यात विज्ञानाची ओळख करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासही महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
सेमाना पार्कमध्ये विज्ञान, पर्यटन आणि मनोरंजनाचा संगम घडविणाऱ्या या नव्या सुविधांमुळे गडचिरोलीकरांसह जिल्ह्याबाहेरील पर्यटकांनाही आकर्षित करण्यास मदत होणार असून, सेमाना पार्कची ओळख एक आधुनिक शैक्षणिक व पर्यटन केंद्र म्हणून अधिक बळकट होणार आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




