आजाद समाज पार्टीची मोठी घोषणा : गावागावात नेमणार प्रतिसरपंच


- ग्रामपातळीवर संघटन मजबूत करण्याचा निर्धार; गडचिरोली जिल्ह्यातील १,६८८ गावांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे वारंवार पुढे ढकलल्या जात असल्या तरी आगामी काळात ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीने गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी बैठकीत गावागावात प्रतिसरपंच ही अभिनव संघटनात्मक संकल्पना राबविण्याची घोषणा करण्यात आली.
जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायती आणि १,६८८ गावांमध्ये पक्षाचे संघटन उभे करून शेवटच्या गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
गावात प्रश्न असतील तर प्रतिसरपंच तिथे पोहोचेल -
पक्षाच्या मते, प्रतिसरपंच हा केवळ पक्षाचा पदाधिकारी न राहता गावातील जनतेचा आवाज, नागरिकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारा कार्यकर्ता आणि प्रशासनाला जाब विचारणारा स्थानिक प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. गावातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची माहिती घेऊन ती प्रशासनासमोर मांडण्याची जबाबदारी प्रतिसरपंचांवर सोपविण्यात येणार आहे. सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांचे राजकारण गावागावात पोहोचवायचे आहे, असा संदेश या संकल्पनेच्या माध्यमातून पक्षाने दिला आहे.
प्रस्थापित राजकारणाला नवे आव्हान -
ग्रामपातळीवर संघटन उभारण्यासाठी आजाद समाज पार्टीने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पारंपरिक राजकीय पक्षांच्या तुलनेत गावातील तरुणांना थेट संघटनात्मक जबाबदारी देण्याचा हा प्रयोग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.
विशेषतः काँग्रेस आणि भाजपसारख्या प्रस्थापित पक्षांच्या ग्रामपातळीवरील राजकीय संघटनांना पर्याय निर्माण करण्याच्या दृष्टीने आजाद समाज पार्टीची ही रणनीती कितपत प्रभावी ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गावनिहाय प्रतिसरपंच नियुक्त करण्याचे आदेश -
संघटन मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना गावनिहाय प्रतिसरपंच नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावातील सक्रिय, सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या तसेच जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या तरुण-तरुणींनी प्रतिसरपंच पदासाठी पक्षाकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी केले. या माध्यमातून प्रत्येक गावात पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता निर्माण करून स्थानिक प्रश्नांशी थेट जोडलेले संघटन उभे करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
प्रतिसरपंचांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर -
नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रतिसरपंचांची राजकीय व सामाजिक भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी पक्षाच्या वतीने लवकरच दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात ग्रामपंचायत कारभार, नागरिकांचे प्रश्न, प्रशासनाशी संवाद, शासकीय योजना, सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा तसेच संघटनात्मक कामकाज अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील अनुभवी आणि दिग्गज मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
प्रत्येक गावात संघटन, प्रत्येक प्रश्नावर आंदोलन -
गावपातळीवर सक्षम आणि संघर्षशील नेतृत्व निर्माण करणे, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि ग्रामविकासाला गती देणे हा प्रतिसरपंच संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील १,६८८ गावांपर्यंत पक्षाचे संघटन पोहोचवून जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष उभा केला जाईल. आगामी काळात गावागावातील जनता आणि तरुणाई हीच पक्षाची खरी ताकद असेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केला. प्रत्येक गावात संघटन, प्रत्येक प्रश्नावर आंदोलन या भूमिकेतून पक्षाने ग्रामपातळीवरील राजकीय व सामाजिक सक्रियता वाढविण्याचा निर्धार केला आहे.
बैठकीत पक्षप्रवेश; नवीन जबाबदाऱ्यांची शक्यता -
दरम्यान, पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी बैठकीदरम्यान काही नागरिकांनी आजाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षमता आणि कार्याचा आढावा घेऊन आगामी काळात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती -
बैठकीला प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हा संघटक हंसराज उराडे, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन काटेंगे, डॉ. प्रशांत सातार, महासचिव अंकुश कोकोडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, महिला सचिव शोभा खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, गडचिरोली महिला तालुकाध्यक्षा सविता बांबोळे यांच्यासह अश्विनी रायपुरे, हरीश वाकडे, नितीन दुर्गमवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Petrol Price




