महत्वाच्या बातम्या

 भरधाव दुचाकीची उभ्या ट्रकला धडक : दुचाकीस्वाराचा मृत्यू, तिघे जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड-चिंचोली मार्गावर पंजाबी ढाब्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात ट्रकची दुरुस्ती करणाऱ्या दोघांसह दुचाकीवरील एक जण असे तिघे जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास नागभीडपासून आठ किलोमीटर अंतरावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पळसगाव येथील आकाश शंकर राहुलवार (२६) हे ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी २११७ मधून नागभीड येथून भंगार घेऊन तळोधीच्या दिशेने जात होते.

नागभीडपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर चिंचोळी परिसरात ट्रकमध्ये बिघाड झाल्याने त्यांनी पंजाबी ढाब्याजवळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून दुरुस्तीचे काम सुरू केले. दरम्यान, रात्री सुमारे ८ वाजता नागभीडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४० ई ९५६० क्रमांकाच्या दुचाकीने ट्रकजवळ असलेल्या व्यक्तींना धडक दिली. या अपघातात आकाश राहुलवार, कैलास वाडसे आणि गौरव पंचवटे हे जखमी झाले. तर मांगुरुळ येथील दुचाकीस्वार शेखर आबाजी भजनकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

जखमी शेखर भजनकर यांना सहकाऱ्यांसह रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी नागभीड पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) आणि २८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नागभिड पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos