तीन दिवसांपासून बेपत्ता व्यावसायिकाचा विहिरीत मृतदेह आढळला


- उमरेडमधील घटना; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज, मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५२ वर्षीय व्यावसायिकाचा मृतदेह मंगळवारी ६ ऑक्टोबर दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास जोगीठाणा पेठ परिसरातील एका विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिकदृष्ट्या त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मृताचे नाव ज्ञानेश्वर दिनकर सहारकर (५२, रा. जोगीठाणा पेठ, उमरेड) असे आहे. उमरेड शहरातील न्यायालयाच्या बाजूला त्यांचे झेरॉक्स सेंटर आहे. मागील आठवडाभरापासून ते काही कारणास्तव चिंतेत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
दरम्यान, शनिवारी ३ ऑक्टोबर ज्ञानेश्वर सहारकर हे कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. बराच वेळ उलटूनही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांच्या मदतीने त्यांचा परिसरात तसेच इतर संभाव्य ठिकाणी शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळून न आल्याने अखेर उमरेड पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदविण्यात आली.
मंगळवारी दुपारी जोगीठाणा पेठ परिसरातील डोंगरे यांच्या मालकीच्या विहिरीत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
उत्तरीय तपासणीदरम्यान मृतदेहाची ओळख पटली. तो ज्ञानेश्वर सहारकर यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मृतदेह आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
ज्ञानेश्वर सहारकर यांना दारूचे व्यसन असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यामुळे दारूच्या नशेत त्यांनी विहिरीत उडी घेतली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच ते मागील काही दिवसांपासून चिंतेत असल्याने त्यांच्या मृत्यूमागे काही आर्थिक कारण होते का, याचाही तपास होणे गरजेचे आहे.
दरम्यान, आत्महत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. उत्तरीय तपासणीचा अहवाल आणि पोलिस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी उमरेड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




Petrol Price




