महत्वाच्या बातम्या

 मतदारांसाठी १० व ११ ऑक्टोबरला विशेष शिबिर : मतदार यादीतील नोंदणी व दुरुस्तीसाठी प्रशासनाचा पुढाकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदारांसाठी १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रातील एकूण १ हजार ३३१ मतदान केंद्रांवर ही शिबिरे घेण्यात येणार आहेत.

या शिबिरांमध्ये मतदार यादी पडताळणी, नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे तसेच नोंदींमध्ये दुरुस्ती करण्याचे काम केले जाणार असून सर्व संबंधित अर्ज शिबिर स्थळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत उपलब्ध करून दिले जातील. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना-६ द्वारे नवीन मतदार नोंदणी, नमुना- ७ द्वारे मतदाराचे नाव वगळणे तसेच नमुना-८ द्वारे मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना मतदार म्हणून नाव नोंदणी करता येणार आहे.

या शिबिरांमध्ये महिला व दिव्यांग नागरिकांच्या मतदार यादीतील नाव नोंदणीसाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार असून या कालावधीत दिव्यांग, तृतीयपंथी आणि असंरक्षित भटक्या व विमुक्त जमातींच्या नागरिकांसाठी विशेष नोंदणी शिबिरे सुद्धा आयोजित केली जाणार आहेत.तसेच प्रारूप मतदार यादी सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध असून नागरिकांनी आपले नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारीअनिल गावित यांनी केले आहे.





  Print






Related Photos