महत्वाच्या बातम्या

 शेतात काम करताना वाघाने घेतला जीव : आगरझरीत ६० वर्षीय महिलेचा करुण अंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : रोजच्या जगण्यासाठी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी-२ बिटात आज सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंदा सूर्यभान मंगाम (वय अंदाजे ६०), रा. आगरझरी या राखीव वन कक्ष क्रमांक १८७ लगत असलेल्या सर्व्हे क्रमांक १०/४ मधील स्वतःच्या शेतात शेतीची कामे करीत होत्या. दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच दुर्गापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे आणि पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा तसेच मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला.

मंदा यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्त्या सदस्याला अशा दुर्दैवी पद्धतीने गमावल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. घटनेनंतर आगरझरी परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाकडून मृत महिलेचे पती सूर्यभान लक्ष्मण मंगाम यांना घटनास्थळी तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. दरम्यान, हल्ला करणाऱ्या वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळ परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. तसेच आगरझरी येथील नागरिकांना सतर्क राहून शेतातील कामे करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करत जनजागृती करण्यात येत आहे.

या घटनेचा पुढील तपास मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहेत.





  Print






Related Photos