रेल्वेच्या धडकेत चितळाचा मृत्यू : नागभीड-चंद्रपूर रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी वन विभागातील तळोधी वनपरिक्षेत्राच्या आलेवाही बीटमधील कक्ष क्रमांक ९४ येथे रेल्वेच्या धडकेत पाच वर्षीय नर चितळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागभीड-चंद्रपूर रेल्वेमार्गावरून होणाऱ्या वन्यजीवांच्या मृत्यूचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रेल्वे विभागाकडून वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक अरविंद मने, वनरक्षक तोरले, वन्यजीव अभ्यासक तथा स्वॅब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर आणि बचाव पथक प्रमुख जीवेश सय्याम यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
त्यानंतर मृत चितळाला सावरगाव वन डेपो येथे आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा आकरे यांनी त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर वन विभागाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे, अवघ्या आठवडाभरापूर्वी याच परिसरात रेल्वेच्या धडकेत एका अस्वलाचाही मृत्यू झाला होता. गेल्या वर्षभरात या रेल्वेमार्गावर गौर, चितळ आणि सांबर यांसह विविध वन्यजीवांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जंगलातून जाणारा हा रेल्वेमार्ग वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.
गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्ग नागझिरा, ताडोबा तसेच ब्रह्मपुरीच्या वनक्षेत्रातून जातो. या मार्गावर वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रेल्वेची वेगवान वाहतूक आणि जंगलातून जाणारा मार्ग यामुळे वन्यजीवांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. वन्यजीव प्रेमी आणि अभ्यासकांकडून वारंवार सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत असतानाही प्रश्न कायम असल्याचे दिसून येत आहे.
जंगलातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना जाळीदार संरक्षक कुंपण उभारावे, तसेच वन्यजीवांच्या हालचाली असलेल्या भागात आवश्यक त्या उपाययोजना करून रेल्वे अपघात टाळावेत, अशी मागणी स्वॅब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या वन्यजीवांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि वन विभागाने संयुक्तपणे ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.




Petrol Price




