महत्वाच्या बातम्या

 २१ ऑगस्टला राज्यातील ३६ जिल्ह्यांत जलसंधारण जनजागृती अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा होणाऱ्या या दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

३६ जिल्ह्यांत महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर -
जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात तरुणांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि जलसंधारणाचे महत्त्व समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

पाणी ही भविष्यातील सर्वात महत्त्वाची गरज असून, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे वॉक फॉर वॉटरच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

युवा पिढीसाठी रील्स स्पर्धा -
जलसंधारणाचा संदेश युवा पिढीपर्यंत आधुनिक माध्यमातून पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून जलसंधारण, पाणी बचत आणि जलस्रोतांच्या संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. राज्यातील तरुणांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

क्यूआर कोडद्वारे सहभाग नोंदविण्याचे आवाहन -
या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

जलसंधारणाचे महत्त्व केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता त्याचे रूपांतर दैनंदिन जीवनातील सवय आणि सामूहिक जबाबदारीमध्ये व्हावे, हा या अभियानाचा उद्देश आहे.

जलसंधारण ही लोकचळवळ व्हावी -
जलसंधारण ही केवळ राज्य शासनाची जबाबदारी नसून त्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जलसंधारणाच्या उपाययोजना यशस्वी होण्यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, युवक आणि सामान्य नागरिक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे या जनजागृती अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. पाणी अडवा, पाणी जिरवा या मूलमंत्राला जगवूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.





  Print






Related Photos