महत्वाच्या बातम्या

 अनियंत्रित कारची दुचाकीला जोरदार धडक : दाम्पत्य जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर–चंद्रपूर महामार्गावरील एपीजे अब्दुल कलाम गार्डनजवळील वळणावर अनियंत्रित कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी २.४५ वाजता घडली. या अपघातात दुचाकीस्वार सुरज खिरटकर २३ वर्ष आणि त्यांची पत्नी दिपाली खिरटकर २० वर्ष रा. चंद्रपूर, हे दोघे जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली.

सुरज खिरटकर हे पत्नीसमवेत स्कूटी क्रं एमएच ३४ सीटी ६२९९ ने बल्लारपूरहून चंद्रपूरकडे जात होते. याचवेळी कोठारी येथील ईशांत वांढरे १९ वर्ष हा कार क्रं एमएच ३४ बीआर ९८९५ ने चंद्रपूरच्या दिशेने जात होता. एपीजे अब्दुल कलाम गार्डनजवळील वळणावर कार अनियंत्रित होऊन दुचाकीला धडकली. धडकेनंतर दुचाकी रस्त्यालगतच्या भिंतीवर जाऊन आदळली. अपघाताची माहिती मिळताच टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत जखमी दाम्पत्याला चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असून वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. असे असतानाही वाहन वेगाने चालविल्याचा आरोप होत आहे. अवघ्या १९ वर्षीय युवकाच्या हातात कार देण्यात आल्याने त्याच्या वाहनचालक क्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. वेळीच नियंत्रण न मिळाल्यास या अपघातात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहनचालकांच्या निष्काळजीपणावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos