महत्वाच्या बातम्या

 इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : इंदिरा गांधी गार्डन स्कूल, चंद्रपूर येथे जेसीआय गरिमा फाऊंडेशन, क्षमा बासरकर, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, चंद्रपूर तसेच जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये बालहक्क, बालसुरक्षा, सुरक्षित वातावरण तसेच विविध शासकीय बालकल्याण योजनांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित विविध बाबींची माहिती देण्यात आली. बालकांवर होणारे अत्याचार, छळ, शोषण किंवा त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याविरोधात आवाज उठविणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी विश्वासू व्यक्ती, पालक, शिक्षक अथवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी अभिषेक मोहुर्ले, जिल्हा समन्वयक, चाइल्ड हेल्पलाइन (CHL), प्रिया पिंपळशेंडे, समुपदेशिका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष (DCPU) आणि प्रीती खातखेडे, वन स्टॉप सेंटर (OSC) यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनीविद्यार्थ्यांशी संवाद साधून बालसुरक्षा व संरक्षणाच्या विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सुरक्षित, आनंदी आणि पोषक वातावरण मिळणे गरजेचे आहे. यासाठी पालक, शिक्षक, समाज आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांविषयी तसेच अडचणीच्या काळात उपलब्ध असलेल्या मदत व समुपदेशनाच्या सुविधांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. शाळेतील विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या जनजागृती कार्यक्रमातून बालसुरक्षेबाबत समाजात सकारात्मक संदेश देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.





  Print






News - Chandrapur




Related Photos