महत्वाच्या बातम्या

  सावली शिवारात गौणखनिजावर मारला डल्ला


- शासकीय जमिनीवर मुरूम उत्खनन; शेतकऱ्यांत संताप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : हिंगणघाट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गौणखनिजाच्या अवैध उत्खननाचा गोरखधंदा चांगलाच फोफावल्याचे चित्र आहे. नुकतेच लोकमतने वेळा येथील अवैध मुरूम उत्खननाचा प्रकार उघडकीस आणला होता. ईटीएस मोजणीनंतर तब्बल २७ हजार ब्रास मुरूमाचे बेकायदा उत्खनन झाल्याचे समोर आले होते. हा प्रकार ताजा असतानाच आता सावली (वाघ) शिवारातील शासकीय जमिनीवरही मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन होत असल्याची बाब समोर आली आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावली (वाघ) येथील शासकीय सर्व्हे क्रमांक ५७३ आणि ६०७ मधून गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस मुरूम उपसा सुरू होता. सध्या पावसामुळे गेल्या तीन दिवसांपासून उत्खनन तात्पुरते बंद आहे. मात्र, त्यापूर्वी पोकलेनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन करून हजारो ब्रास मुरूमाची वाहतूक करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या उत्खननासाठी नेमकी कोणती परवानगी देण्यात आली होती? परवानगी असल्यास ती किती ब्रास मुरूम उपशाची होती? उत्खनन नियमांनुसार होत होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

शेतकरी त्रस्त; प्रशासनाकडून कारवाईची प्रतीक्षा -

अवैध मुरूम उत्खनन आणि ओव्हरलोड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार आहे. शेतात जाणारे रस्ते खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महसूल विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असतानाही हे उत्खनन नेमके कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.

खोल खड्ड्यांमुळे जनावरांच्या जीविताला धोका -

शासकीय जमिनीवर झालेल्या मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे खोल खड्डे निर्माण झाले आहेत. नियमानुसार उत्खननानंतर हे खड्डे बुजविणे आवश्यक असतानाही तसे करण्यात आलेले नाही. पावसाचे पाणी साचल्यानंतर हे खड्डे जनावरांसह नागरिकांसाठीही धोकादायक ठरू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, संबंधित दोन सर्व्हे क्रमांकांमध्ये दोन वेगवेगळ्या घटकांकडून उत्खनन करण्यात आले. यातील एक स्थानिक व्यक्ती असून दुसरी एक बांधकाम कंपनी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची महसूल विभागाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





  Print






News - Wardha




Related Photos