महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक कारवाई


- चंद्रपूर, भद्रावती, गडचांदूरमध्ये छापे; तीन आरोपी अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी बुधवारी मोठी कारवाई करत चंद्रपूर शहर, भद्रावती आणि गडचांदूर परिसरात छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि इतर साहित्य जप्त केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

चंद्रपुरात घरातील बेडखाली लपवला होता गांजा -
चंद्रपूर शहर पोलिसांनी भिवापूर वॉर्ड परिसरातील एका राहत्या घरावर छापा टाकून १ किलो १०९ ग्रॅम गांजाजप्त केला. या प्रकरणी पांडुरंग बानलवार याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

चंद्रपूर शहर पोलिसांचे डी. बी. पथक गस्त घालत असताना भिवापूर वॉर्डातील पांडुरंग बानलवार हा स्वतःच्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्या घराची झडती घेतली.

झडतीदरम्यान खोलीतील बेडखाली प्लास्टिक पिशवीत वाळलेली हिरव्या रंगाची पाने, फुले, देठ आणि बिया असलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत एपीआय राजेंद्र सोनवणे, पीएसआय दत्तात्रय कोलते, पीएआय विलास निकोडे यांच्यासह पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

गडचांदूरमध्ये गांजासह डोडा पावडर जप्त -
गडचांदूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अमली पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रमसिंग बहादूरसिंग भोंड ४२, रा. वॉर्ड क्रमांक ६, गडचांदूर याच्या घरावर छापा टाकला.

घराची झडती घेतली असता पोलिसांना ९५७ ग्रॅम गांजा आणि २७९ ग्रॅम डोडा पावडर आढळून आली. पोलिसांनी एकूण २० हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून विक्रमसिंग भोंड याला अटक केली.ही कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुखदेव गोदे, पीएसआय पंकज हेकाड आणि त्यांच्या पथकाने केली.

भद्रावतीत तरुणाकडून ९०७ ग्रॅम गांजा जप्त -
भद्रावती पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात कारवाई करत सोनल दशरथ महाकुळकर २० वर्षे रा. नाग मंदिरामागे, शिवाजीनगर, भद्रावती याला अटक केली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सोनल महाकुळकर हा राहत्या घरातून गांजाची विक्री करत होता. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता एमएच-३१-व्हीएस-९०६३ क्रमांकाच्या दुचाकीच्या हँडलला लटकविलेल्या पिशवीत ९०७ ग्रॅम गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजासह दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली एपीआय वीरेंद्र केदारे, पीएसआय संतोष केदार, पीएसआय गजानन तुपकर आणि त्यांच्या पथकाने केली.

गांजाचा पुरवठा करणाऱ्यांवर पोलिसांची नजर -
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून, आता जिल्ह्यात गांजाचा पुरवठा नेमका कुठून होतो, याचा शोध घेण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

अमली पदार्थांच्या तस्करीची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी पुरवठादारांवरही कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos