जनविरोधी धोरणांविरुद्ध राज्यव्यापी संघर्षाचा इशारा : शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत निर्णायक भूमिका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत राज्य व देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी राज्यभर तीव्र जनआंदोलने उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीत पक्षाच्या सर्व जनसंघटनांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावरील संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीने पूर्ण करण्याचा तसेच प्रत्येक गावात पक्षाची जनाधार वाढविण्यासाठी व्यापक संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न, शेती व्यवसायावरील वाढते आर्थिक संकट, शेतीमालाला हमीभावाचा अभाव, वाढती महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्य जनतेवरील आर्थिक भार याबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नसून सरकारच्या धोरणांमुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
NEET सह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, दोषींना कठोर शिक्षा करून परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता प्रस्थापित करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.
आगामी जनगणना मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी पक्षाच्या सर्व संघटनांनी गावागावांत जनजागृती मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले.
Special Intensive Revision (SIR) अंतर्गत मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक गावात आणि प्रत्येक मतदान केंद्रावर सतर्क राहतील. लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नांविरुद्ध शेतकरी कामगार पक्ष संविधानिक आणि लोकशाही मार्गाने ठाम लढा उभारेल, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीत राज्यातील सद्यः राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी काळात शेतकरी, कामगार, कष्टकरी, युवक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यभर व्यापक जनआंदोलनांची मालिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणे ही शेतकरी कामगार पक्षाची परंपरा असून, ती अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरून जनतेचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन मध्यवर्ती समितीने केले.
बैठकीला पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, प्रा. एस. व्ही. जाधव, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, बाबासाहेब देवकर, मोहन गुंड, विदर्भाचे नेते रामदास जराते, चित्रलेखा पाटील, महिला आघाडीच्या नेत्या मानसी म्हात्रे, साम्या कोरडे तसेच मध्यवर्ती समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष, शेतकरी-कामगारांच्या न्यायासाठी अखंड लढा आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन हीच शेतकरी कामगार पक्षाची भूमिका असल्याचा ठाम पुनरुच्चार करण्यात आला. राज्यातील जनविरोधी निर्णयांविरोधात पक्ष अधिक आक्रमक भूमिका घेत जनतेच्या प्रश्नांवर व्यापक लोकचळवळ उभारेल, असा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
News - Rajy




Petrol Price




