मूळ कळपात परतले तीन हत्ती : वनविभागाला दिलासा, आठ दिवसांत शेतपिकांचे मोठे नुकसान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मूळ कळपातून वेगळे होऊन मागील आठ दिवसांपासून गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा परिसरात संचार करणारे तीन हत्ती अखेर आपल्या मुख्य कळपात परतले आहेत. दोन दिवसांपूर्वी हे तीनही हत्ती वैरागड वनक्षेत्रातील मुख्य कळपात सामील झाल्याने वनविभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, या कालावधीत चुरचुरा परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
माहितीनुसार, सावली तालुक्यातून परतल्यानंतर हत्तींचा मुख्य कळप काही दिवस पोर्ला परिसरात थांबला होता. त्यानंतर हा कळप वैरागड वनक्षेत्रात दाखल झाला. गेल्या १५ दिवसांपासून मुख्य कळप वैरागड परिसरातच वास्तव्य करत आहे. मात्र, त्याच कळपातील तीन हत्ती आठ दिवसांपूर्वी वेगळे होऊन चुरचुरा परिसरातील जंगलात आले होते. त्यामुळे मुख्य कळप आणि हे तीन हत्ती अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्तींची हालचाल सुरू होती.
एकाच वेळी दोन ठिकाणी हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागत असल्याने वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक झाली. हत्तींच्या हालचालींचे निरीक्षण करण्याबरोबरच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणे आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभागाला सातत्याने दक्ष राहावे लागले.
दरम्यान, चुरचुरा परिसरात वास्तव्यास असताना या तीन हत्तींनी अनेक शेतांमध्ये घुसून उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. धानासह अन्य पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हत्तींच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तर रात्रीच्या वेळी गावकऱ्यांनाही सतर्क राहावे लागत होते.
अखेर दोन दिवसांपूर्वी हे तीनही हत्ती वैरागड परिसरात पोहोचून मुख्य कळपात सामील झाल्याने वनविभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, मुख्य कळप अद्याप वैरागड परिसरात असल्याने वनविभागाकडून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी जंगल परिसरात वावरताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणीही पुढे येत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




