महत्वाच्या बातम्या

 भद्रावती बसस्थानक परिसरात एमडी ड्रग्जसह अल्पवयीन ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर आळा घालण्यासाठी भद्रावती पोलिसांनी केलेल्या कारवाईत बसस्थानक परिसरातून एमडी (मेफेड्रोन ) ड्रग्ज विक्रीसाठी  आणलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ५.२१ ग्रॅम एमडी ड्रग्ज व मोबाईलसह एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणात चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील एका संशयित पुरवठादाराविरुद्धही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष नारायण केदार यांना २७ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, भद्रावती बसस्थानकाजवळील सार्वजनिक शौचालय परिसरात एक युवक एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी थांबला आहे. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकासह नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला.

पोलीस पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर संशयित युवकाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडतीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशातून प्लास्टिकच्या पाउचमध्ये ठेवलेले पांढऱ्या रंगाचे संशयित एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, चंद्रपूर-भद्रावती बसचे तिकीट तसेच रिअलमी कंपनीचा मोबाईल आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जचे वजन ५.२१ ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत १३ हजार रुपये तर जप्त मोबाईलची किंमत १० हजार रुपये असे एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

प्राथमिक चौकशीत अल्पवयीनाने हा एमडी ड्रग्ज चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील पुनीत चौधरी याच्याकडून घेतल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ग्राहक शोधून दिल्यास कमिशन देण्याचे आमिष दाखवत त्याला भद्रावती येथे ड्रग्ज विक्रीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या माहितीच्या आधारे संबंधित पुरवठादाराचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलगा आणि चंद्रपूर येथील संशयित पुनीत चौधरी यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम ८(क), २२(ब), २९ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थांच्या अवैध तस्करी व विक्रीविरोधात चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केली असून, या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos