महत्वाच्या बातम्या

 आरमोरी वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचे पुनरागमन : धान रोवणीच्या हंगामात शेतकरी भीतीच्या छायेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आरमोरी वनपरिक्षेत्रातील वैरागड–सालमारा जंगल परिसरात रानटी हत्तींच्या कळपाचा पुन्हा वावर सुरू झाला असून, एक टस्कर हत्तीदेखील याच परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन धान रोवणीच्या हंगामात हत्तींच्या पुनरागमनामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने कृषिपंपधारकांसह कोरडवाहू शेतकऱ्यांनी धान रोवणीच्या कामांना वेग दिला आहे. पावसामुळे शेतीकामांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असले, तरी दुसरीकडे रानटी हत्तींच्या हालचालींमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

शेतात काम करताना कोणत्याही क्षणी हत्तींचा सामना होण्याची शक्यता असल्याने शेतकरी सावधगिरी बाळगत आहेत.

तीन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास रानटी हत्तींचा कळप वैरागड–ठाणेगाव मार्ग ओलांडताना दिसूनआला होता. या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून वैरागड–ठाणेगाव तसेच वैरागड–रामाळा मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तासांसाठी बंद ठेवली होती. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.

सध्या हत्तींचा कळप अद्याप वैरागड–सालमारा जंगल परिसरातच असल्याची माहिती असून, शेतकरी व नागरिकांनी शेतात अथवा जंगलालगतच्या भागात जाताना विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकट्याने शेतात जाणे टाळावे, सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा जंगलालगतच्या भागात वावर करताना अधिक काळजी घ्यावी, असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, वन विभागाकडून हत्तींच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि हत्ती दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos