गडचिरोलीतील माओवादीविरोधी कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून सुरक्षा दलांचे अभिनंदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवादीविरोधात करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील आपल्या अधिकृत संदेशातून गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या अधिकारी व जवानांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माओवादाविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात कारवाई केली. या कारवाईत माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले.
कारवाईदरम्यान सुमारे ५ ते ६ टन वजनाचे एक लेथ मशीन, १५० क्लेमोर व बीजीएल पाईप्स, २२० नग १२-बोअर पाईप्स, २० रायफल रॉड मेटल पट्ट्या तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य नष्ट करण्यात आले.
या कारवाईमुळे माओवाद्यांच्या शस्त्रनिर्मिती आणि घातपाताच्या क्षमतेला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात आले आहे. सुरक्षा दलांच्या धाडसी आणि प्रभावी कारवाईमुळे संभाव्य धोका टळल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहभागी सर्व अधिकारी व जवानांचे कौतुक केले. राज्य सरकार माओवादाच्या समूळ उच्चाटनासाठी कटिबद्ध असून अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
News - Gadchiroli




Petrol Price




