महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात ९३ गुंतवणूकदारांची तब्बल २.७७ कोटींची फसवणूक : आरोपीचे माहिती देण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कमी कालावधीत मोठा आर्थिक परतावा, सोने व प्लॉट परतफेडीचे आमिष दाखवून चंद्रपूर जिल्ह्यातील ९३ गुंतवणूकदारांची तब्बल २ कोटी ७७ लाख ४८ हजार ९२६ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

गडचांदूर येथील रेवनाथ आनंदराव एकरे (वय ४६) यांच्या तक्रारीवरून १८ नोव्हेंबर २०२२ रोजी रामनगर पोलिस ठाण्यात आरोपी १) मोतीलाल दुलाल सरकार, २) बेल्लारी व्यंकटाचारी आणि ३) अनुमंडला महेंदर रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील टेकुला मुक्तीराज याने ग्रँड फॉर्च्युनर इन्फ्रा डेव्हलपर्स नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून एजंट अमोल गणेश महाजन (चंद्रपूर), भालचंद्र किसन वडस्कर (उपरवाही, ता. गडचांदूर), अंजन्ना बेलम (रयतवारी, चंद्रपूर) आणि मोतीलाल सरकार (बंगाली कॅम्प, चंद्रपूर) यांच्या मदतीने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले.

कंपनीमध्ये १ लाख १० हजार रुपये गुंतविल्यास ५ ग्रॅम सोने व २०० दिवसांपर्यंत दररोज ९३५ रुपये मिळतील, तसेच ५ लाख रुपयांचा प्लॉट घेतल्यास ५०० दिवसांत संपूर्ण रक्कम परत मिळेल, अशी आश्वासने देण्यात आली होती. याशिवाय प्लॉट बुकिंगसाठी १ लाख ६५ हजार रुपये भरल्यास १० ग्रॅम सोने देण्याचे आमिषही दाखविण्यात आले.

फिर्यादी रेवनाथ एकरे यांनी आपल्या १४ सहकाऱ्यांच्या मदतीने कंपनीमध्ये २ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र अपेक्षित परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान चंद्रपूरमधील एकूण ९३ गुंतवणूकदारांची २ कोटी ७७ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले. आरोपी बेल्लारी व्यंकटाचारी आणि अनुमंडला रेड्डी यांनी तेलंगणामध्ये ग्रँड फॉर्च्युनर इन्फ्रा अँड डेव्हलपर्स ही फर्म स्थापन केली होती. त्याच फर्मच्या माध्यमातून टेकुला मुक्तीराज याने चंद्रपूरमध्ये व्यवहार सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सध्या आरोपी १) मोतीलाल दुलाल सरकार (दुर्गा माता मंदिराजवळ, बंगाली कॅम्प, चंद्रपूर), २) बेल्लारी व्यंकटाचारी (साई बालाजी कॉम्प्लेक्स, एनएफसी कॉलनी, बंडलगुडा, गोळकोंडा, हैदराबाद) आणि ३) अनुमंडला महेंदर रेड्डी (बालाजी हिल्स कॉलनी, मेडचल, तेलंगणा) हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पोलिस नियंत्रण कक्षाचे ०७१७२-२७३२५८ व २६४७०२ हे दूरध्वनी क्रमांक, पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर (मो. ८८८८१८८५२९) तसेच पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर (मो. ९३५९२५८३६५) यांच्याशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन तपास अधिकाऱ्यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos