महत्वाच्या बातम्या

 भरधाव ट्रकच्या धडकेत महामार्गावरील मजुराचा जागीच मृत्यू


- बाम्हणी/खजरी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील घटना; पत्नी आणि दोन मुलांचा कुटुंबाचा आधार हरपला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : राष्ट्रीय महामार्गावर काम करत असताना भरधाव ट्रकने बॅरिकेड्स उडवत दिलेल्या जोरदार धडकेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी २४ नोव्हेंबर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाम्हणी/खजरी येथे घडली. डुडेश्वर धनलाल चुटे ३८ वर्ष, रा. बाम्हणी/खजरी असे मृत मजुराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या पत्नीवर आणि दोन लहान मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डुडेश्वर चुटे हे आर.आर.एम. कंपनीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर मजूर म्हणून कार्यरत होते. घटनेच्या दिवशी ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बाम्हणी/खजरी परिसरात रस्त्याच्या मध्यभागी वाढलेले गवत आणि काटेरी झुडपे कापण्याचे काम करीत होते. कामाच्या ठिकाणी वाहनचालकांना सावध करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते.

दरम्यान, कोहमाराकडून देवरीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक जेएच ०२-बीडब्ल्यू ५९११ ने कामाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स जोरदार धडकेत उडवून दिले. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट काम करीत असलेल्या डुडेश्वर चुटे यांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात ट्रकखाली चिरडले गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या दुर्घटनेमुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या डुडेश्वर यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाचा आधारच हरपला आहे.

डुडेश्वर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. रोजच्या मेहनतीतून मुलांचे भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वडिलांचा अचानक मृत्यू झाल्याने दोन्ही मुलांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरपले आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या संगोपनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

महामार्गावरील मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर -
या दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर काम सुरू असताना वाहनचालकांना पुरेशी पूर्वसूचना मिळावी, बॅरिकेड्स आणि दिशादर्शक फलक योग्य अंतरावर लावण्यात यावेत, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे. एका अपघातामुळे कष्टकरी कुटुंबाचा कर्ता पुरुष हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos